आयपीएल : दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाची पुन्हा परीक्षा, हैदराबाद गोलंदाजीत मजबूत, विल्यम्सनला संधी शक्य
वृत्तसंस्था / अबुधाबी
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमधील सामना शनिवारी होणार असून केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील कौशल्याची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.
केकेआरच्या सेटअपमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पण कार्तिकने मागील चुकांतून कोणताच बोध घेतला नसल्याचे दिसून आले आणि त्याने काही असे अनपेक्षित निर्णय घेतले जे मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले. मुंबई इंडियन्सविरुद्ध केकेआरला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातही त्यांचा बिगेस्ट हिटर असणारा आंद्रे रसेलच्या फलंदाजीचा क्रम चर्चेचा विषय बनला. गेल्या मोसमात रसेलने केकेआरतर्फे सर्वाधिक धावा जमविल्या होत्या. त्याने 249 चेंडूत 510 धावा झोडपताना 204.81 चा जबरदस्त स्ट्राईक रेट ठेवला होता. मुंबईविरुद्ध त्याला सहाव्या क्रमांकावर पाठविण्यात आले होते. पण यावेळपर्यंत केकेआरची स्थिती हाताबाहेर गेली होती. इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनला मध्यफळी बळकट करण्यासाठी स्थान देण्यात आले. पण तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येईपर्यंत धावगती 13 पेक्षा जास्त झाल्याने त्यालाही फार काही करता आले नव्हते.
गोलंदाजीतही केकेआरकडून धोरणात्मक चूक झाली. त्यांचा प्रमुख स्पिनर सुनील नरेनला पॉवरप्लेमधील शेवटच्या षटकापर्यंत गोलंदाजीपासून दूर ठेवण्यात आले होते. पॅट कमिन्स हा केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू, पण त्याचा ‘खराब’ दिवस असल्याने तो अपयशी ठरल्यानंतर नरेनच्या हातात चेंडू देण्यात आला होता. मात्र नरेनचे हमखास गिऱहाईक असलेला रोहित शर्मा त्यावेळपर्यंत पुरता सेट झाला होता. या संघाचा प्रशिक्षक न्यूझीलंडचा ब्रेन्डॉन मेकॉलम असून त्याच्यासारखा आक्रमक मनोवृत्ती असणाऱया खेळाडूने इतके बचावात्मक धोरण का अवलंबले, हे तर्कापलीकडचे आहे.
सनरायजर्स हैदराबाद संघाच्या मध्यफळीत ताकद आणि अनुभवाचा अभाव असल्याने आरसीबीविरुद्ध त्यांना पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. शेवटच्या 5 षटकांत 43 धावांची गरज असताना सनरायजर्सने शेवटचे सात फलंदाज केवळ 32 धावांत गमविले आणि त्यांना केवळ 10 धावांनी पराभूत व्हावे लागले. अष्टपैलू मिशेल मार्श जखमी झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कर्णधार वॉर्नर दुर्दैवीरीत्या धावचीत झाला होता, त्याची भरपाई करण्यास तो उत्सुक झाला आहे. केन विल्यम्सन दुखापतीतून बरा झाला असेल तर फलंदाजी मजबूत करण्यासाठी त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते. सनरायजर्सची गोलंदाजी नेहमीच प्रभावी ठरली आहे. संघव्यवस्थापन रशिद खानच्या साथीला मोहम्मद नबीला आणण्याची शक्यता असून भुवनेश्वर हा त्यांच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख असेल.