अध्याय तेरावा
एकदा ज्ञानाचा प्रकाश जीवनात पसरला की, ईश्वराशिवाय या विश्वात अन्य काही नाहीच अशी खात्री पटते. ईश्वराच्या अनन्य भक्ताला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असल्याने, या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही हे उमगलेले असते. वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणाऱया स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे. गुरुकृपेच्या योगाने जो ज्ञानसंपन्न होतो, त्याला देहाची भावना बाधक होत नाही. त्याने कर्मे केली तरी त्यामुळे त्याच्याकडे कर्तेपणा येत नाही. स्वप्नात आगीत होरपळून निघालेल्या मनुष्याला जाग आल्यावर भाजल्याची जाणीवसुद्धा नसल्याने त्यातील निरर्थकत्व लक्षात येते त्याप्रमाणे ज्ञात्यालाही आत्मज्ञानाच्या योगाने जाग आल्यावर इतर सर्व गोष्टी स्वप्नवत वाटतात आणि त्या त्याला बाधत नाहीत. स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये देहात एकच आत्मा असतो. आत्मा देहामध्ये विदेही असून सर्वांचा साक्षी आहे. जागृतीमध्ये इंद्रियांना पहाण्याचे सामर्थ्य असते, तर स्वप्नामध्ये मन पाहणारे असते. सुषुप्तीमध्ये मनुष्य गाढ झोपलेला असल्याने पहाण्यासारखे काहीच नसते. वास्तविक पाहता मन आणि इंद्रिये ही जडच आहेत. त्यांना पाहण्याचे सामर्थ्य आत्माच देत असतो. तो मनाचा चालक, इंद्रियांचा प्रकाशक, असून साक्षित्वाने शरीरात वावरत असतो. आतां सुषुप्तीमध्ये आत्मा नाही म्हंटले तर मी आनंदांत निजलो होतो, ही जाणीव आत्माच करून देतो. आता आत्मा म्हणजे काय ते समजावून सांगतो. आत्मा हा प्रकृतीकार्याहून निराळा असतो. तो देहादि अवस्थांना प्रकाशित करणारा आणि गुण व इंद्रिये ह्यांचे नियमन करणारा असतो. इंद्रिये आत्मा नव्हेत कारण त्याचे कर्म नेहमी एकदेशी असते आणि आत्मा तर सर्वकर्ता सर्वोत्तम असून सदासर्वदा कर्मे करून निष्कर्म आहे. मन हा काही आत्मा नव्हे. संकल्प आणि विकल्प हे मनाचे कर्म आहे आणि आत्मा हा निर्विकल्प, निरुपम आहे. आत्मा सुषुप्तीसुखभोगाचा साक्षी असून त्रिभुवनात केवळ पाहणे हेच ज्याचे स्वरूप आहे, तो मीच होय हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव. कौशल्याने परमात्मा साध्य केला तर, तोच साधकांच्या उपयोगाला येतो आणि त्याच्याच सामर्थ्याने योगही सिद्धीला जातो. हे जे मी तुम्हाला सांगितले ते श्रुतिशास्त्रांना संमत असेच आहे. त्यांचा विचार करून परमार्थाच्या मार्गात राहून संसाराचे कोडे सोडवावे. संसार मायेच्या त्रिगुणांमुळे बंधनकारक होतो. त्या गुणांच्या अवस्थेनेच मन व्यापलेले असते. ज्याप्रमाणे डोळय़ांतील पाणी गोठून त्याचाच पडदा होऊन राहातो आणि तो डोळय़ालाच झांकून टाकतो, त्याप्रमाणे माझी माया, माझ्यामुळेच प्रबळ झालेली आहे व मलाच तिने झाकून टाकले आहे. पौर्णिमेचा अत्यंत निर्मल असा पूर्णचंद्र उगवला म्हणजे त्यावर पृथ्वीची पडछाया पडते व त्यामुळे चंद्रबिंबावर काळा डाग पडला आहे असे सर्व लोकास दिसू लागते. पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यामधील अंतराचा विचार केला तर ते फारच मोठे आहे. अर्थात चंद्राला पडलेला डाग खोटा, पण लोक तोच खरा मानतात. अशा प्रकारे माया ही माझ्या ठिकाणी आहे. तिने मला स्पर्शसुद्धा केलेला नाही, तरी लोक मिथ्याभासानेच तिच्या ठिकाणी भुलतात. मिथ्या असलेली गुणांची अवस्था ते अहंकर्तृत्वाने आपल्याच माथ्यावर घेतात. तेणेकरून विषयभोगाच्या अवस्था वासनायुक्त होऊन वाढतात. एकंदरीत दोन्ही देहांचे बंधन जीवाला मिथ्याच लागलेले आहे. याकरिता त्याचे छेदन करण्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करावा. पण नुसते विचार करून थांबू नये प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. केवळ अनुमानच करीत राहिले तर अनुमानिक ज्ञान होते पण आत्मज्ञान झाल्याचा अहंकार सुटत नाही. म्हणून कृती न करता नुसता विचार करत बसल्यास अविद्येचे बंधन तुटत नाही. म्हणून अहंकारवीरहीत होण्यासाठी साधुसंतांची सेवा करावी. साधूंमध्येसुद्धा परिपूर्ण साधुत्व एका सद्गुरूच्याच ठिकाणी असते. सद्गुरु हेच खरे साधु व सज्जन असतात, म्हणून सद्गुरूच्या चरणांची सेवा करावी. त्या सेवेने संसारबंधन तुटते.
क्रमशः







