प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगर परिसरातील नादुरुस्त दिवे दुरुस्त करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते अंधारात आहेत. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कंत्राटदाराला विचारणा करण्याची तसदी अधिकाऱयांनी घेतली नाही. दिवाळी सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण सणाच्या तोंडावर खानापूर रोडसह शहरातील विविध रस्त्यांवर अंधार पसरला आहे.
सध्या दिवाळी सणानिमित्त नागरिक खरेदीकरिता बाजारपेठेत येत आहेत. दिवाळी सण मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. कोरोनामुळे आतापर्यंतचे सण साधेपणाने करण्यात आले. सध्या कोरोनात अटी शिथिल करण्यात आल्याने नागरिक खरेदीकरिता रात्री उशिरापर्यंत बाजारापेठेत असतात. पण सणातदेखील शहर अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. महापालिका व्याप्तीमधील पथदिपांच्या देखभालीचे काम कंत्राट पद्धतीने देण्यात आले आहे. पण कंत्राटदाराकडून देखभालीचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदीप पूर्णपणे बंद आहेत. मात्र दुरुस्त करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. कॉलेज रोड, डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, काँग्रेस रोड, बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौकपर्यंतच्या आनंदवाडी रोडवरील, बॅ नाथ पै चौक ते वडगाव पिंपळकट्टा चौकपर्यंतच्या रस्त्यावरील पथदीप बंद अवस्थेत आहेत.
विशेषत: या सर्व रस्त्यांवर विकासकामे राबविण्यात येत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अशातच रस्त्यांवर अंधार पसरल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मुश्कील बनले आहे. रस्त्यांची व पथदिपांची दुरुस्ती करण्याबाबत महापालिका कार्यालयात सातत्याने तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. पथदिपांच्या दुरुस्तीकरिता महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर अनेकवेळा तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे काही ठिकाणी खड्डय़ांमुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पथदिपांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डचा कानाडोळा
कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱया रस्त्यांवरील पथदीप बंद असून वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणाऱया खानापूर रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. खानापूर रोडशेजारी ग्लोब थिएटरमागील बाजूस असलेल्या मैदानावरील पथदीप अनावश्यक रात्रंदिवस सुरू ठेवण्यात आले आहेत. पण कॅन्टोन्मेंट हद्दीतील हायमास्ट आणि पथदीप बंद आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डने विविध चौकात हायमास्ट बसविले आहेत. पण सदर हायमास्ट सदैव बंदच असतात. मिलिटरी विनायक मंदिर ते अरगन तलावपर्यंतच्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील पथदीप, क्लब रोड, रामघाट रोड, कॅम्प परिसर अशा विविध रस्त्यांसह ठिकठिकाणचे पथदीप बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.









