वृत्तसंस्था/ श्रीनगर
पीएजीडीचे प्रवक्ते सज्जाद लोन यांनी मंगळवारी एक पत्र लिहून गुपकार आघाडीतून अंग काढून घेतले आहे. पीएजीडी सोडणारे ते पहिले नेते ठरले आहेत. लोन यांनी फारुख अब्दुल्ला यांना पत्र लिहून गुपकारला सोडचिठ्ठी दिली आहे. डीडीसी निवडणुकीत गुपकारच्या उमेदवारांच्या विरोधात गटातील उर्वरित पत्रांनी स्वतःचे उमेदवार उभे केले होते. याचमुळे आमच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागल्याचा आरोप करत सज्जाद यांनी हा निर्णय घेतला आहे.
डीडीसी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही या गटापासून अंतर राखले आहे. तर सज्जाद लोन हे काश्मीरच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असून ते मेहबूबा मुफ्तींचे घनिष्ठ सहकारी मानले जातात. सज्जाद यांचे वडिल अब्दुल गनी लोन यांची 2002 मध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
गुपकार गटात नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, अवामी नॅशनल कॉन्फरन्स आणि माकप सामील आहे. काँग्रेस गुपकारचा समर्थक असला तरीही यात थेट सहभागी नाही.









