मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : भाजपतर्फे गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित स्पर्धांचे बक्षिसवितरण
प्रतिनिधी /पणजी
भारतीय संस्कृती आणि परंपरा टिकवण्यात भारतीय जनता पक्षाचा मोलाचा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने भारतीय संस्कृतीला उच्च स्थानावर नेले आहे. भाजपने गोव्याच्या विकासासोबतच गोव्याची संस्कृती आणि परंपरा रक्षणासाठी भरीव योगदान दिलेले आहे. भाजपाचे हे कार्य पुढे चालू राहण्यासाठी येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात सत्तेवर येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी गोव्यातील नागरिकांनी भाजपाला निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भारतीय जनता पक्षातर्फे गणेश चतुर्थी निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ आज पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रदेश सरचिटणीस व अनिवासी आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, भाजप सांस्कुतीक विभागाचे सल्लागार गोरख मांदेकर, समन्वयक ऍडव्होकेट दिपक तिळवे व सहसमन्वयक पूर्नानंद च्यारी व्यासपीठावर उपस्थित होते.
गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात 450 वर्षे राहिला, तरीसुद्धा गोव्याची परंपरा एकता आणि सर्वधर्मसमभाव गोवेकरांनी कायम जपला. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात बाहेरचे पक्ष येऊन येथील शांतता बिघडण्याची शक्मयता निर्माण झालेले आहे. गोव्याची संस्कृती रक्षणासाठी बाहेरच्याची गरज नाही. त्यामुळे गोमंतकीयांनी सावध राहावे व गोव्याच्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच काम करणाऱया भाजपला पुन्हा सत्तेवर आणावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
भाजपा सरकारने कलेला वाव देताना 350 शिक्षक विविध शाळांमध्ये नियुक्त केले. त्यामुळे कला-संस्कृती संगीत आणि विविध कलात विद्यार्थी पुढे येऊ लागलेले आहेत. असे सांगून गोवा सरकारच्या विविध योजनांचा लाभ कलासंस्था आणि कलाकारांना नेहमीच मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा सरकार कलाकारांच्या मागे मागे सदैव ठामपणे उभे असून, येत्या काळातही कलाकारांच्या कलेचे संरक्षण व्हावे यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.
भाजपाच्या सांस्कृतिक विभागाने अवघ्या काळामध्ये कोरोनाचे संकट असतानासुद्धा विविध स्पर्धा यशस्वीपणे घेवुन दाखवल्या. राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या स्पर्धाना लोकांचा सहभाग कमीच असतो. तरीसुद्धा भाजपावर लोकांचा विश्वास वाढल्यामुळेच भाजपाच्या स्पर्धात लोकांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग दर्शवल्याचे तानावडे म्हणाले. यापूर्वी पद्मपुरस्कार फक्त उच्चशिक्षित लोकाना वशिल्याने मिळत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खऱया विद्वानाला, कष्टकरी सर्वसामान्य गरीबांना पद्म पुरस्कार देऊन भाजपा भारताच्या संस्कृतीशी किती जोडला गेला आहे याचे दर्शन घडवला आहे, असेही तानवडे म्हणाले.
ऍड.नरेंद्र सावईकर यांनी, भाजपाने गोव्याची संस्कृती जपल्याचे सांगून गोव्यातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवावा. जेणेकरून गोव्याचा जास्त विकास घडेल, असे प्रतिपादन केले. ऍड. दीपक तिळवे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी नैवेद्य पान स्पर्धा, सेल्फी विथ गणेश स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि फॅमिली आरती स्पर्धा या चार स्पर्धातील विजेत्यांबरोबरच स्पर्धेत भाग घेतलेल्यांनाही मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
10 हजार सरकारी नोकऱया भरणारच : मुख्यमंत्री
सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 10 हजार सरकारी नोकऱया भरणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. जे कर्मचारी दिर्घकालीन रजेवर जातात त्यांच्या जागा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे भरण्यात येतात, असा खुलासाही त्यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 हजार सरकारी जागा भरण्याचे आश्वासन म्हणजे दिशाभूल व जुमला असल्याची टीका केली होती. त्याबाबत विचारता डॉ. सावंत यांनी वरील उत्तर दिले. नोकरभरतीची प्रक्रिया चालू असून ती थांबणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.









