ऑनलाईन टीम / जिनिव्हा :
कोरोना संकटामुळे यंदा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला जगभरातील नेत्यांना उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणारी ही महासभा प्रथमचं ऑनलाईन घेण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे संघाच्या महासभेकडे जगाचे लक्ष लागले आहे. दरवर्षी या महासभेला 193 देशांचे प्रतिनिधी हजेरी लावतात. मात्र, कोरोनामुळे इतर देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे ही सभा ऑनलाईन घेण्यात येईल. जगभरातील नेते या महासभेला स्वतः उपस्थित न राहता, आपल्या भाषणांचे व्हिडीओ पाठवणार आहेत.
या सभेसाठी कोणत्याही देशांचे नेते आणि प्रतिनिधी आपला व्हिडिओ संदेश पाठवू शकतात. सभेत वेळापत्रकाप्रमाणे हे व्हिडीओ संदेश चालवले जातील. यावेळी मात्र, या देशांचे कायमस्वरूपी प्रतिनिधी उपस्थित असतील, असे राष्ट्र संघाकडून सांगण्यात आले आहे.