प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी रात्रीपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. पावसामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. रेनकोट आणि छत्रीचा आधार घेत खरेदीदार खरेदी करत होते. तर या पावसामुळे भाजी विपेते आणि फेरीवाल्यांची मात्र तारांबळ उडाली होती.
संततधार पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. अचानकपणे जोरदार सरी कोसळत होत्या. त्यानंतर काहीवेळ पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. अत्यंत योग्यवेळी पावसाचे आगमन झाल्याने सर्वच पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. त्यामुळे बळीराजातून आनंद व्यक्त होत आहे.
संततधार पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचले होते. याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबून होते. गटारीही तुडुंब भरून त्यातील पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत होते. त्यामुळे पादचाऱयांना चालताना काही ठिकाणी कसरत करावी लागली. सध्या कोरोनाच्या तणावाखाली जनता वावरत आहे. त्यातच पावसामुळे फ्लु, सर्दी, खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मागीलवषी आलेल्या महापूरानंतर जनता आताच सावधानता बाळगताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनानेही त्याची तयारी केली आहे. जिह्यातील विविध नद्यांना देखील मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. मलप्रभा नदी तर पात्राबाहेर वाहताना दिसत आहे. याचबरोबर महाराष्ट्रातूनही कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांना पाणी येत असल्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









