व्हालसे, दांडो पुलावरून पाणी वाहण्याचा प्रसंग, बागायती, शेतीबरोबर घरे, मंदिरात पाणी शिरले
प्रतिनिधी / सांगे
सतत पावसाने झोडपल्याने सांगे भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. नेत्रावळी भागात घाटमाथ्यावर होणाऱया मुसळधार पावसामुळे सांगे तालुक्मयातील नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आली. सांगेतील व्हालसे तसेच दांडो येथील पुलावरून पाणी वाहून गेले. साळावली धरणाचा जलाशय तुडुंब भरून वाहू लागल्याने साळावली नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. नदीकाठचे अनेक लोकांचे पंप हाऊस बुडून ऊस लागवड, बागायती आणि शेतजमिनींत पाणी घुसले आहे. मंदिर तसेच घरांतही पाणी शिरले आहे.
नेत्रावळी येथील ‘नेत्रावळी’ नदी तसेच पोत्रे, व्हालसे येथील नदीची पात्रे तुडुंब भरून वाहत असल्याचे दृष्य शुक्रवारी सकाळी पाहावयास मिळाले. शुक्रवारी सकाळी व्हालसे, नायकिनी पुलावरून पाणी वाहून गेले. चिखलमळा, दांडो, धडे इत्यादी ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने सुमारे सात-आठ घरांत पाणी शिरल्याचे वृत्त आहे. दांडो, मीराबाग, धडे इत्यादी ठिकाणी काही पार्क करून ठेवलेली वाहने पाण्याने वेढली गेली. मुगोळी येथील श्री कलनाथ मंदिरात पाणी शिरले. वरकटो येथील रस्ताही पाण्याखाली गेला. पाण्याची पातळी वाढल्याने वरकटो येथील होली क्रॉस कपेलच्या कुंपणापर्यंत पाणी पोहोचले होते.
प्रशासकीय अधिकाऱयांकडून पाहणी
शुक्रवारी सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहा. अभियंता दयानंद नाडकर्णी यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच जेथे मदत पाहिजे तेथे संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता कृष्णकांत पाटील, साहा. अभियंता जेसन मिनेझिस, कनिष्ठ अभियंता स्वप्नील दिवकर यांनी साळावली धरणाला भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. दुपारनंतर हळूहळू पाणी ओसरू लागले.
धरणातून पाणी सोडल्याची चर्चा तथ्यहीन
साळावली धरणातून पाणी सोडल्याने सांगे, संगमेश्वर येथून वाहत जाऊन मीराबागमधून पुढे जुवारी नदीच्या शाखेला मिळणाऱया नदीला पूर आल्याचे लोकं बोलत होते. शुक्रवार सकाळपासून धरणातील जास्तीचे पाणी गेट उघडून नदीत सोडल्याची सर्वत्र चर्चा होती. मात्र यात तथ्य नसल्याचे जलस्रोत खात्याकडे चर्चा केली असता समजले. मुळात येथे पाणी सोडण्यासाठी गेट नाही. धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी 41.15 मीटरवर पोहोचली की, जलाशय भरून वाहू लागतो.
8.5 इंच पावसाची नोंद
शुक्रवारी सकाळी धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी 43.03 मीटरवर आली होती. यापूर्वी 2009 साली जेव्हा सर्वाधिक पाऊस झाला होता त्यावेळी 43.21 मीटरपर्यंत पाणी आले होते. सांगे-पाजीमळ येथे गुरुवारी 8.5 इंच इतका पाऊस पडला. एकूण 87 इंच पावसाची नोंद झाली आहे. जलस्रोत खाते, काम विभाग 12 यांच्या अखत्यारित येणाऱया उगे तसेच कुयणामळ पाणीपुरवठा योजनांचे पंप हाऊस पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. सांगेचे आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, समाजसेविका सावित्री कवळेकर यांनी पूरग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली.









