प्रतिनिधी/ धारबांदोडा
धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यात कंत्राटी पद्धतीवर गेली दहा ते पंधरा वर्षे काम करणाऱया 89 कामगारांना कामावर घेण्यास मनाई केल्याने संतप्त कामगारांनी शनिवारी कारखान्याच्या गेटसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी कामगारांशी चर्चा करून सोमवारपर्यंत प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संजीवनी साखर कारखान्यामध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱया या कामगारांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात येते. मात्र यंदा या कंत्राटाची मुदत जुलै महिन्यात संपुष्टात आली तरी त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे काल 1 ऑगस्टपासून कारखान्याच्या गेटवर हजेरीपट न ठेवल्याने कामगारांना कारखान्यात प्रवेश करणे शक्य झाले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर कामगारांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा केली. सोमवारपर्यंत दोन महिन्यांचे कंत्राट वाढवून देण्याचे व त्यानंतर सर्व 89 कामगारांना इतर ठिकाणी सामावून घेण्याचे आश्वासन मंत्री पाऊसकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कामगार नेते पुती गांवकर हे उपस्थित होते.
सोमवारीपर्यंत कंत्राट नूतनीकरण केल्याचा आदेश न मिळाल्यास मंगळवारी सर्व कामगारांना घेऊन सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा इशारा पुती गावकर यांनी यावेळी दिला.
दरम्यान, याच आठवडय़ात ऊस उत्पादक संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कारखान्यासमोर आंदोलन केले होते. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी मध्यस्थी करून ऊस उत्पादकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करून त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाल्याने ऊस उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.









