ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये रोज संघर्ष, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात शिवसेना नेते संजय राऊत हे भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आघाडीवर असतात. अशातच संजय राऊत आणि भाजप खासदार वरुण गांधी यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर वरून गांधीही काही मुद्द्यांवरून भाजपवर टीका करत असतात. आता वरून गांधी यांची दिल्लीतील संजय राऊत यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री भेट झाली. यावेळी त्यांनी सोबत जेवण करत तब्बल तीन तास चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या या डिनर डिप्लोमसीमुळे राजकीय चर्चांनीही उधाण आलं आहे.
दरम्यान, वरुण गांधींच्या भेटी आणि चर्चेवर खासदार राऊत यांनी, एका राजकीय पक्षाचे नेते असले, खासदार असले आणि गांधी कुटुंबाशी संबंधित असले तरी ती सदिच्छा भेट होती. कोणत्याही भेटीत राजकीय विषय निघत असतात. तसा या भेटीतही निघाला. पण ही भेट सदिच्छा भेटच होती, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच या पुढेही आम्ही एकमेकांना भेटणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. राऊत यांचे काँग्रेस नेते राहुल गांधींशी असलेले जवळचे संबंध आणि आता वरुण गांधी यांनी अचानक राऊत यांची भेट घेणं यामुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लगावले जात आहेत.
वरुण गांधी आणि आम्ही अनेक विषयावर चर्चा केली. वरुण गांधी हे उत्तम लेखक आहेत. छान पुस्तकं लिहितात. विचार करतात. अनेक विषयावर ते चांगल्या गप्पा मारतात. राजकीय विषय चर्चेत निघत असतात. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत त्यांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. पण माझी आणि त्यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. वरुण गांधी आणि त्यांच्या कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते. या पुढेही आम्ही भेटण्याचं ठरवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.