क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
बेंगलोरात सुरू असलेल्या 37व्या सब-ज्युनियर आणि 47व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याच्या संजना प्रभुगावकर हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेचे आयोजन कर्नाटक जलतरण संघटनेने अखिल भारतीय जलतरण संघटनेच्या सहकार्याने बेंगलोरात केले आहे. पर्वरीतील आर्डी स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱया संजना प्रभुगावकरने मुलींच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक गट एकमध्ये 2ः28ः71 अशी नवीन वेळ देत सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्रच्या पलक धामीला 2ः29ः52 या वेळेने रौप्यपदक तर महाराष्ट्रच्याच पलक जोशीने 2ः29ः89 अशी वेळ देत ब्राँझपदक मिळविले. गोव्याच्या मेगन दी आल्मेदा हिला तीन मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये कास्यप्रदकावर समाधान मानावे लागले.









