वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर येथील पुरातन मंदिरांतून सोमवारी शिव शंभोचा गजर घुमणार असून श्रावण सोमवार म्हणून मोठया प्रमाणात भक्तगण दर्शनसाठी गर्दी करण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील सप्तेश्वर ,कर्णेश्वर,रामेश्वर पंचायतन व राजवाडी येथील सोमेश्वर मंदिरातून व्यवस्थापक मंडळांनी खास व्यवस्था केली आहे. मात्र पारंपारिक पध्दतीने पुजा अर्चा करण्यात येणार असून भाविकांनी व पर्यटकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच सोशल डिस्टंटीशचे नियम पाळत भाविक दर्शन घेणार आहेत.
दुसऱया व शेवटच्या श्रावण सोमवारी भाविकांची विशेष गर्दी होते. संगमेश्वर तालुक्यातील मंदिरातून भक्तगणांसाठी खास व्यवस्था केलेली असते. तालुक्यातील प्रसिध्द म्हणून नावलौकीक असलेले कसबा येथील कर्णेश्वर मंदिर.या ठिकाणी मोठया प्रमाणात भक्तगण गर्दी करतात. राजवाडी येथील सोमेश्वर मंदिरात एक्का आयोजित केला जातो.भक्तगण ईश्वराचे नामसंकिर्तन करण्यास रममाण होतात.तसेच सप्तेश्वर येथे भक्तगण पायी प्रवास करीत शिवशंभोचे दर्शन घेतात.या ठिकाणी असलेली सात तळी व पुरातन मंदिरे व निसर्गरम्य परिसर भक्तगणांना आकर्षित करीत असतो. दुसऱया व चौथ्या श्रावण सोमवारी व शनिवारी मोठया प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतात. श्रावण सोमवारी शिवमंदिरातून होणारी गर्दी लक्षात घेवून मंदिर ट्रस्ट व्यवस्थापन करुन भाविकांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करु नये असे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे.
कर्णेश्वर मंदिरात गर्दी न करण्याचे आवाहन
कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यावर्षी श्रावणी महिन्यात भाविकांनी श्री कर्णेश्वर मंदिर कसबा संगमेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी करु नये असे आवाहन श्री कर्णेश्वर देवस्थान सार्वजनिक न्यासाचेवतीने करण्यात आले आहे.









