दुसऱया महायुद्धानंतर महायुद्धपूर्व आणि महायुद्धोत्तर जग, अशी विभागणी करण्यात येऊ लागली. तर 1995 नंतर जागतिकीकरणपूर्व आणि जागतिकीकरणाच्या नंतरचा काळ, अशी चर्चा झडायला लागली. अगदी त्याच धर्तीवर कोरोनापूर्व जग आणि करोनानंतरचे जग, अशी मांडणी करण्यात यायला लागली आहे. साहित्याच्या वाचनावरही याचा परिणाम दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग जगातील दोनशेहून अधिक देशात पसरायला लागला आणि ‘द प्लेग’ हे अल्बर्ट काम्यूचे पुस्तक धडाधड खपू लागले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची ‘व्हायरसेस अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन’ ही एक ग्रंथमालिका आहे. जागतिक हवामान बदलांमुळे रोगाच्या संसर्गावर कसा परिणाम होतो, त्याची माहिती त्यात देण्यात आली आहे. सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला, त्या काम्यूच्या पुस्तकात उत्तर आफ्रिकेकतील एका शहरात झालेला प्लेगचा शिरकाव आणि मृत्यूच्या तांडवाला माणसांनी दिलेला प्रतिसाद याचे चित्रण करण्यात आले आहे. फ्रँक एम. स्नोडेनच्या ‘एपिडेमिक्स अँड सोसायटी, फ्रॉम द ब्लॅक डेथ टू द प्रेझेंट’ या पुस्तकात संसर्गजन्य रोगांमुळे वैद्यकशास्त्र व सार्वजनिक आरोग्यावर झालेल्या परिणामांची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यात कला, धर्म, बौद्धिक इतिहास आणि युद्ध यावरील रोगांच्या परिणामांचाही वेध घेण्यात आला आहे. माझ्या एका पशुवैद्यक मैत्रिणीने ‘स्टिल ओव्हर ऍनिमल इन्फेक्शन्स अँड द नेक्स्ट ह्यूमन पँडेमिक’ या डेव्हिड कॅमन याच्या पुस्तकाची शिफारस मला केली आहे. इबोला, सार्स आणि एचआयव्ही/एड्स हे सर्व रोग जनावरांपासून संक्रमित झाले आहेत. हे कसे घडले आणि त्यावर आपण आळा कसा घालायचा, याचे प्रतिपादन त्या पुस्तकात आहे. स्टीव्हन टेलरने ‘द सायकॉलॉजी ऑफ पँडेमिक्स, प्रिपेअरिग फॉर द नेक्स्ट ग्लोबल आउटब्रेक ऑफ इन्फेक्शियस डिसीझ’ हे गंभीर पुस्तक लिहिले असून, त्याचा विषयच इंटरेस्टिंग आहे.
कोरोनासारखे महासंकट जेव्हा जगावर येऊन आदळते, तेव्हा त्यामुळे जसा संहार होतो, तशीच सर्जनशक्तीलाही चालना मिळते. म्हणजे, जसे की यापुढे ग्रामीण भागातच विकेंद्रित उद्योगव्यवसाय कसे सुरू करता येतील, शहरातली गर्दी कमी कशी करता येईल, रुग्णाचा संपर्क टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल असा विचार सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे या संकटकाळात अनेक चित्रपट कलावंतांनी घरात बसून कोरोनाविरुद्ध लढण्याचा संदेश एकत्रितपणे दिला आहे. त्याचप्रमाणे जगभरच्या संगीतकार व गायकांनी सुरांचा एक समान धागा विणला आहे. काहींनी अगदी घरातच काही हलकेफुलके व्हीडिओ बनवून, या तणावाच्या काळात लोकांचे थोडे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे.
ब्रिटिश महाकवी जॉन मिल्टन (1608-1674) अर्थातच प्युरिटनांच्या बाजूचा होता. क्रॉमवेलचा परकीय भाषाविषयक सचिव म्हणून त्याची नेमणूक झाली होती. याच भूमिकेतून लॅटिन भाषेमधून लिहिलेल्या ‘इंग्लिश जनतेच्या बचावार्थ’ त्याला साऱया युरोपात प्रसिद्धी मिळाली. पुढे प्युरिटनांचे कॉमनवेल्थ उलथवून टाकून, दुसऱया चार्ल्सला पुन्हा गादीवर बसवले गेले. क्रॉमवेलला फासावर लटकावण्यात आले. मिल्टनच्या अटकेचे हुकूम निघाले, पण तो वाचला. सार्वजनिक जीवनातल्या निराशेच्या या कालखंडात म्हणजे, 1667 साली मिल्टनने ‘पॅराडाइज लॉस्ट’ हे खंडकाव्य लिहिले.
1825 साली रशियात झार राजवटीविरुद्ध झालेला उठाव अयशस्वी ठरला खरा, पण राजकीय व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणारी क्रांतीची पहिली चाहूल इतिहासात नोंदली गेली. पुश्किनने आपल्या कवितेत या चाहुलीचा वेध घेतला. ‘द प्रॉफेट’ आणि ‘द जिप्सीज’ या कवितांमध्ये तत्कालीन व्यवस्थेबद्दलचा असंतोष उमटला आहे. ‘द ब्राँझ हॉर्समन’ ही पुश्किनची दीर्घकविता म्हणजे रशियाच्या भविष्याबद्दलचे सखोल चिंतनच आहे. झारने त्यातला बराचसा भाग पुश्किनला वगळायला लावला. जेव्हा गुलामगिरीचा कहर झाला होता, तेव्हा हॅरिएट स्टोव (1811-1896) या लेखिकेने त्याविरुद्ध बंड पुकारले. ‘अंकल टॉम्स केबिन’ या तिच्या कादंबरीने अमेरिकन समाजाला गुलामगिरीच्या विरुद्ध उभे राहण्यास प्रवृत्त केले. या कादंबरीचा परिणाम इतका की, अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनीही स्टोवच्या कादंबरीचा विशेष उल्लेख केला होता. फ्योदर दस्तयेवस्की (1821-1881) हे तर मानवी अंतर्मनाचा तळापासून वेध घेणारे रशियन लेखक. ते बंडखोर राजकीय गटाचे सभासद होते आणि रशियातील कंगालपणा तसेच चर्च व निकोलस पहिला यांच्या अन्याय-अत्याचाराबद्दल ते आक्रमक भूमिका घेत असत. त्यांची सैबेरियात सश्रम कारावासासाठी रवानगी करण्यात आली होती. सैबेरियातील मरणप्राय यातनांचे प्रतिबिंब दस्तयेवस्कीच्या ‘द हाउस ऑफ द डेड’ मध्ये पडले आहे. ‘ऍनिमल फार्म’ आणि ‘1984’ या कादंबऱयांद्वारे शासनव्यवस्थेवर आपल्या उपरोधिक शैलीत भाष्य करणारे जॉर्ज ऑरवेल (1903-1950) हे विसाव्या शतकातले प्रभावी लेखक. मंदीचे व बेकारीचे चटके त्यांनी स्वतः भोगले होते. ब्रह्मदेशातील पोलीस खात्यात त्यांनी पाच वर्षे काम केले होते. पोलीस अधिकारी म्हणून जुलूम व दडपशाही करणे भाग पडल्यामुळे, ते सहन न होऊन त्यांनी ती नोकरी सोडली. इंग्लंडमध्ये ते परतले, तेव्हा मंदीमुळे त्यांचे हाल झाले. मग ऑरवेल पॅरीसमध्ये गेले. तिथेही हॉटेलात कपबशा विसळणे आणि फूटपाथवर वा झोपडपट्टीत राहणे हेच त्यांना अनुभवावे लागले. याच अनुभवांवर आधारलेले त्याचे पहिले पुस्तक ‘डाउन अँड आउट इन लंडन अँड पॅरीस’ हे 1933 साली प्रसिद्ध झाले. ब्रह्मदेशातील अनुभवांवरील ‘बर्मीज डेज’ ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर ते ललित लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. ऑरवेलने स्पेनमधल्या यादवी युद्धातही भाग घेतला आणि जनरल फ्रँकोची फॅसिस्ट राजवट आणि क्रांतिकारक यांच्यातला संघर्षही बघितला. रशियातील साम्यवादी राजवटीकडे ऑरवेल आशेने बघत होते. मात्र साम्यवादामागील सर्वंकषवादाचा धोका बघून ते हादरले आणि ‘ऍनिमल फार्म’ आणि ‘1984’ या कादंबऱयांमधून त्यांनी हुकूमशाही प्रवृत्तींविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. रशियन लेखक मिखाइल शोलोखाव (1950-1984) यांनी मानसशास्त्रीय वास्तववादाचा पुरस्कार आपल्या साहित्यातून केला. ‘अँड क्वाएट फ्लोज द डॉन’ या आपल्या कादंबरीत ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून ते सोव्हिएत रशियातील साम्यवादी सत्तेपर्यंतचा कालखंड उलगडून दाखवला. टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’ या महाकादंबरीचे स्मरण व्हावे, अशी मानवजातीच्या सुखदु:खांचे जबरदस्त चित्रण करणारी ही कादंबरी आहे. पाब्लो नेरुदा हे जगद्विख्यात कवी. ते काही वर्षे चिली सरकारचे वाणिज्यदूत म्हणून श्रीलंकेपासून स्पेनपर्यंत वेगवेगळय़ा देशांत फिरले. परंतु 1936 साली स्पेनमध्ये भयंकर असे यादवी युद्ध झाले. त्यात नेरुदांच्या जवळच्या मित्राचा बळी गेला. या घटनेचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की, ‘स्पेन इन द हार्ट’ या त्यांच्या काव्यात ही वेदना उमटली.
आजच्या कोरोना काळात माणसाचे समाजजीवन उद्ध्वस्त झाले आहे. तो निराश व एकाकी झाला आहे. त्याला भविष्य अधांतरी व अंधकारमय वाटत आहे. माणसाच्या मनाचा एकूणच सामाजिक अस्थिरतेचा ठाव देशोदेशीचे आजचे लेखकही घेतील याची खात्री वाटते.
नंदिनी आत्मसिद्ध








