प्रतिनिधी/ बेळगाव
येथील बालिका आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी आणि महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने ‘जिल्हय़ातील असाधारण विद्यार्थिनी’ म्हणून निवड झालेली श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी (इ. 10 वी) हिने मुख्यमंत्री मदत निधीस दहा हजाराची मदत केली आहे. सदर रक्कम तिला महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने बक्षीस स्वरुपात मिळाली होती. लॉकडाऊनच्या कालावधीत श्रेयाने स्वत: शिवलेले 1 हजार मास्क जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे सुपूर्द केले. दहावी परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांना हे मास्क पुरवावेत, अशी इच्छा श्रेयाने यावेळी जिल्हा पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
मंगळवारी जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर बेळगावात आले असता त्यांच्याकडे मदतीचा धनादेश आणि मास्क सुपूर्द केले. श्रेयाच्या या कार्याचे जिल्हा पालकमंत्र्यांसह उपस्थितांनीही तोंडभरून कौतुक केले. जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी श्रेयाचे खास कौतुक केले. श्रेयाने या आधीही बक्षीस स्वरुपात मिळालेली रक्कम गरजू व संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत स्वरुपात दिली आहे. लॉकडाऊन कालावधीत तिने सुमारे 1100 मास्क शिवले आहेत. त्यातील 1 हजार मास्क यंदा दहावीच्या परीक्षेस बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी मोफत दिले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ आदींसह उपस्थित आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आदींनाही मास्कचे वाटप केले. यावेळी बालिका आदर्श शाळेचा शिक्षकवर्ग आणि श्रेयाचे आई-वडील उपस्थित होते.









