मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडीस यांचे आवाहन, मनपा-लोकमान्य सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम
प्रतिनिधी/ पणजी
राजधानी पणजी शहरात फळे देणाऱया झाडांची लागवड करण्याचा उपक्रम मनपाने हाती घेतला असून त्या रोपटय़ांना संरक्षण देण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी सोसायटीने सहकार्याचा हात पुढे केला आहे.
गोवा क्रांतीदिनाचा मुहूर्त साधून हा उपक्रम आरंभ करण्यात आला. त्याद्वारे कांपाल परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. पणजी मनपा, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आणि ’गोवा फॉर्गिव्ह मी’ या स्थानिक एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडीस, स्थानिक एनजीओचे आर्मांदो गोन्साल्वीस, लोकमान्यच्या संचालक सई ठाकुर, साहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक अँथनी आझावेदो, एचआर व्यवस्थापक गायत्री दुभाषी नाईक, ताळगाव शाखा व्यवस्थापक शारुला रायकर, पणजी शाखा व्यवस्थापक अवधूत कामत आणि इतरांची उपस्थिती होती.
प्रत्येकाने एक तरी झाड लावावे ः आग्नेलो फर्नांडीस
काही वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळात कांपाल परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षांची हानी झाली. त्याजागी नवीन झाडे लावून तेथील निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्याची गरज लक्षात घेऊन मनपाने वृक्षरोपण उपक्रम राबविला आहे. त्याद्वारे आतापर्यंत अनेक झाडांच्या जागी नवीन झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे खास करून आंबा, फणस, जांभूळ, यासारखी फळे देणारीच असतील. हा उपक्रम यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यात प्रत्येकाने योगदान दिल्यास तो यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, असे मत मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडीस यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर प्रत्येकाने या उपक्रमात सहभाग घेऊन किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एक झाड दत्तक घ्या ः गोन्साल्वीस
लोकमान्यासह अन्य अनेक आस्थापनांनीही या उपक्रमात सहभाग घेतला असून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे, असे आर्मांदो गोन्साल्वीस यांनी सांगितले. ’समविचारी लोकांच्या सहभागाने काम करणे’ या संकल्पनेवर हा उपक्रमात राबविण्यात येत आहे. त्यासाठी पणजीतील प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे. त्याही पुढे जाताना प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घ्यावे आणि ते फळे देण्यायोग्य होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी आणि जबाबदारी घ्यावी. तसे झाल्यास दहा लाख झाडांची लागवड सहज होऊन जाईल. गरज आहे ती सुरुवात होण्याची, असेही ते म्हणाले.
मनपाचा स्तुत्य उपक्रम ः सई ठाकुर
लोकमान्यच्या संचालक सई ठाकुर यांनी बोलताना संस्थेच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मनपाने हाती घेतलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या माध्यमातून वेळोवेळी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत योगदान देता येणे ही आमच्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे, असेही त्या म्हणाल्या.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कांपाल येथे सुर्यकिरण हॉटेलच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. ही झाडे मोठी होईपर्यंत त्यांना संरक्षण मिळावे यासाठी लोकमान्यतर्फे लोखंडी जाळ्या पुरस्कृत करण्यात आल्या आहेत.









