प्रतिनिधी/ वडूज
हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज वडूज ता.खटाव येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची श्री सिद्धीविनायक रथोत्सव मिरवणूकीने सांगता करण्यात आली. ज्ञानोबा माऊली तुकाराम.. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल… चा गजर आणि ढोल ताश्यांच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
सप्ताह काळात काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, नामवंत व्याख्यात्यांची प्रवचने, किर्तने, जागर असे विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती होती. आज सकाळी ह.भ.प. श्याम महाराज (आळंदी) यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी वाचनाची सांगता करण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. विजय महाराज शिंदे (लोणी) यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी साडे बारा वाजता ह.भ.प. जयंत कुलकर्णी (भोसरे) यांचे श्री गणेश जन्माचे किर्तन झाले. यावेळी परिसरातील हजारो भाविक पारायण मंडपात उपस्थित होते. श्री गणेश जन्माच्या किर्तनानंतर पुष्पवृष्टी झाली. दुपारी एक वाजता पारायण मंडळाचे विश्वस्त , विविध मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथामध्ये श्रींची व श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा ठेवून रथोत्सव मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. बोला पुंडलीक वरदे…चा गजर यावेळी करण्यात येत होता. मिरवणूकीच्या अग्रभागी गावोगावचे वाद्यवृंद संच सहभागी झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम…च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
दहिवडी कराड रोड, शहा पेट्रोल पंप, आयलँड चौक, एस.टी.बस स्थानक, पंचायत समिती, अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय, कर्मवीर नगर, भाग्योदय नगर, पेडगाव रोड, हुतात्मा परशुराम विद्यालय, हुतात्मा स्मारक, मुख्य बाजारपेठ, शेतकरी चौकातून ही मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी रस्त्यांवर सडा-रांगोळी काढून रथ मिरवणूकीचे स्वागत केले.
रथोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक मंडळे, संघटना, सेवाभावी संस्थांच्यावतीने भाविकांना अल्पोपहार, सरबताचे वाटप करण्यात येत होते. काही ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दहिहंडी बांधली होती. रथावर भाविकांनी नारळाची तोरणे व रोख रक्कम अर्पण केली. हरीदास जाधव यांच्यावतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
रथोत्सव सोहळ्यानिमित्त बाजार पटांगण परिसर तसेच शहरात ठिकठिकाणी मेवा मिठाई, खेळण्यांची दुकाने, थाटली होती. रथोत्सव व हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे शहराला व बाजार पटांगण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. सिद्धीविनायक मंदिरा नजिकच असणाया श्री महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.









