ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंका सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे कुटुंबाची श्रीलंका पीपल्स पार्टी विजयी झाली आहे. राजपक्षे यांच्या पक्षाने 225 जागांपैकी 145 जागांवर विजय मिळाला तर 5 जागा मित्रपक्षाला मिळाल्या आहेत.
श्रीलंकचे अध्यक्ष गोटाभाया राजपक्षे हे आता राष्ट्राध्यक्ष असतील. तर पंतप्रधानपदी त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे असणार आहेत. ते नोव्हेंबर 2019 पासूनच ते हंगामी पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या ‘युनायटेड नॅशनल पार्टी’ला केवळ एक जागा जिंकता आली. मागच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 106 जागा मिळाल्या होत्या.
श्रीलंकेच्या राजकारणावर मागील दोन दशकांपासून राजपक्षे घराण्याचा पगडा आहे. 9 महिन्यांपूर्वी राजपक्षे यांच्या पार्टीने राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली होती. 18 नोव्हेंबरला गोटाभाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. दरम्यान, राजपक्षे यांनी केलेल्या विजयाच्या ट्विटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोनवरून त्यांचे अभिनंदन केले आहे.