ऑनलाइन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या पुणे केंद्रातर्फे गरजू नागरिकांना 450 अन्नसामग्री किट व रुग्णालयात 100 पीपीई किटची मदत नुकतीच देण्यात आली.
याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कार्यकर्ते, रोजंदारीवर काम करणारे मजूर, रुग्णालये, निराधार प्राणी यांना पुण्यासह देशभरात मदतीचा हात देण्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून ध्यान व योगाचे मार्गदर्शनही केले जात आहे.
एक विश्वव्यापी आध्यात्मिक अभियान, श्रीमद्म रामचंद्र मिशन धरमपूर या संस्थेचे पुण्यातही मुकुंदनगर परिसरात केंद्र आहे. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे (एसएमआरडी) संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशभाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कठीण काळात जनतेच्या सेवेचे हे कार्य सुरु आहे.
पुण्यासह मुंबई, अकोला, वडोदरा, सूरत, अहमदाबाद, जयपूर, चेन्नई, बंगळुरु आंसह युनायटेड किंगडम येथे देखील मदतकार्य सुरु आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, नर्स, पोलीस, कचरा व्यवस्थापक कामगारांना पीपीई किट, मास्क व सॅनिटायजरची मदत दिली जात आहे. रोजंदारी काम करणा-या मजूरांना भोजनाची व्यवस्था, रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक साधनांची मदत आणि रस्त्यावरील हजारो भटक्या प्राण्यांना अन्न व उपचार पुरविण्याचे कार्य सुरु आहे.








