प्रतिनिधी / सातारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भेट देवून शाळेची पहाणी केली. शाळेच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्या शाळेत येण्याचे मला भाग्य लाभले. या शाळेने अनेक थोर व्यक्ती घडविल्या आहेत. ही शाळा ऐतिहासिक असून याचे जतन केले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आहे. या संविधानामुळे सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेत आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. राज्य शासन त्यांच्याच विचारांवर काम करीत असून शाळेच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.