आज धनत्रयोदशी. आरोग्यदेवता धन्वंतरी जयंती! तसेच धनदेवतेचीही पूजा! आधी तनमन प्रसन्न असल्याशिवाय धनाचा तरी उपभोग कसा घेणार? म्हणूनच सारे वैद्यराज आज या धन्वंतरीदेवाची पूजा करतात. त्याच्या निर्मितीची कथाही पुराणात प्रसिद्ध आहे. देवदानव युद्धात समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली, त्यातील एक म्हणजे धन्वंतरी होय. तो श्लोक आपल्याही परिचयाचा आहे.
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजितकसुरा धन्वंतरीश्चंद्रमा, गाव: कामदुधा सुरेश्वरगजौ रम्भादिदेवाङ्गना। अश्व: सप्तमुख:सुधा हरिधनु: शंखो विषं चाम्बुधे, रत्नानीति चतुर्दशप्रतिदिनम् कुर्वन्तु हे मङ्गलम्।।
वरील श्लोकात उल्लेखिलेल्या रत्नांपैकी सर्वात शेवटी अमृतकुंभ घेतलेले धन्वंतरीदेव सर्वात शेवटी निघाले. तेव्हा इंद्रपुत्र जयंताने तो कुंभ झडप घालून हस्तगत केला आणि पळत सुटला. त्याच्यापाठोपाठ सारे दानव पळाले. तेव्हा ब्रम्हांडाभोवती जयंताने 12 दिवस प्रदक्षिणा घातल्या. म्हणजे पृथ्वीची बारा वर्षे. धावताना बारा ठिकाणी त्याने तो कलश ठेवला. त्या ठिकाणी कुंभपर्व साजरी केली जातात. त्यातील चार पृथ्वीवर आणि उरलेली आठ स्वर्गात आहेत. हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नासिक येथे हे पर्व साजरे केले जाते. धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता. तिला विष्णूचा अवतार मानतात. तिच्या चार हातात शंख, चक्र, औषधी आणि अमृतकलश असतो. प्रथम ब्रह्मदेवाने एक लाख श्लोक आणि एक सहस्त्र अध्याय असलेल्या आयुर्वेदाची रचना केली. त्याने हे ज्ञान अश्विनीकुमारांना, त्यांनी इंद्राला आणि इंद्राने हे ज्ञान धन्वंतरीला दिले. त्याने ही विद्या सुश्रुताला दिली. त्याला उत्तम शल्यचिकित्सक बनवले. धन्वंतरी इ.स.पूर्व दहा हजार वर्षांपूर्वी होऊन गेला असे मानले जाते. तो काशीराज धन्वचा पुत्र. त्याच्या जीवनातील सर्वात मोठा वैज्ञानिक प्रयोग अमृताशी संबंधित आहे. ते प्रयोग त्याने सुवर्णपात्रात केले. म्हणून त्यांचा सुवर्णकलशाशी संबंध आहे. त्यांनी सांगितले की, मृत्यूच्या नाशासाठी ब्रह्मासहित सर्व देवतांनी सोम नावाच्या अमृताचा शोध लावला. धन्वंतरीने सुमारे शंभर मृत्यूंचे वर्णन केले आहे. त्यात एक काल मृत्यू व बाकी सारे अकाल मृत्यू थांबवण्यासाठी प्रयास आणि चिकित्सा आहे. अशा या धन्वंतरीची जयंती साऱया विश्वात वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे पूजा करून कृतज्ञता प्रकट केली जाते. समस्त मानवजातीला रोगविहीन व दीर्घायुषी करण्यासाठी प्रार्थना केली जाते.
ओम् नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये। अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय, त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्रीमहाविष्णुस्वरूपाय श्रीधन्वंतरीस्वरूपाय श्रीश्रीश्री औषधचक्राय नारायणाय नमः।।
सर्वांना आजपासून सुरू होणाऱया दीपपर्वाच्या अर्थात मंगलमय, प्रकाशमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!