दापोली-करंजाळी खापरेवाडीतील घटना
प्रतिनिधी/ दापोली
दापोली वनविभागाने रविवारी करंजाळी गावातील खापरेवाडी येथे विजेचा शॉक देऊन शिकार केलेल्या एका 3 वर्षांच्या डुकराचे 22 किलो मांस जप्त केले. तसेच डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात आलेली केबल व अन्य वस्तूही जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघा भावांना वनाधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, यामुळे चोरटी शिकार करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दशरथ धोंडू बुरटे व त्यांचा भाऊ कृष्णा बुरटे (करंजाळी-खापरेवाडी) यांनी रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास 300 मीटर अंतरावर घरातून विद्युतपुरवठा घेऊन शेताजवळ जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी विजेच्या तारेत विद्युत पुरवठा सोडला होता. पहाटे उजाडल्यावर जेथे विद्युत पुरवठा सोडला होता, त्या ठिकाणी दोघे गेले असता त्यांना तेथे एक 3 वर्षांचा नर जातीचा रानडुक्कर विजेचा धक्का लागून मृतावस्थेत आढळला. या संशयितानी घराशेजारी असलेल्या व मुंबईत राहणाऱया गोविंद बुरटे यांच्या बंद वाडय़ात हा डुक्कर कापला.
दरम्यान, याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱयांना मिळाल्याचे बुरटे बंधूंना समजले. त्यामुळे त्यांनी हे मांस 3 ठिकाणी लपवून ठेवले आणि वाडय़ातील जागा साफ करून काही घडलेच नाही, अशा आवेशात घरी येऊन बसले. दुपारी 2 वाजता बुरटे यांच्या घरी चौकशीसाठी वनविभागाचे अधिकारी पोहोचले व चौकशी करू लागल्यावर आपण त्या गावचेच नाही, या अविर्भावात हे दोन बंधू वागत होते. अखेर त्यांच्याकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने वनविभागाचे अधिकारी त्यांच्या घरातून बाहेर पडले. मात्र वाडय़ाच्या बाहेर पाणी व रक्त दिसल्याने या अधिकाऱयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी पुन्हा बुरटे यांचे घर गाठले. त्यानंतर पुन्हा त्यांची चौकशी सुरू केली असता बुरटे बंधुंनी सर्व माहिती दिली व मुद्देमाल पंचासमक्ष काढून दिला. या प्रकरणी अधिकाऱयांनी या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सावंत, वनरक्षक गायकवाड, जळणे, जगताप यांनी भाग घेतला. दरम्यान या प्रकारामुळे दापोली तालुक्यात अद्याप चोरटी शिकार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.









