ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित, भाटिया-शफालीची अर्धशतके, पूजा-झुलनचे प्रत्येकी 3 बळी,
वृत्तसंस्था/ मॅके, ऑस्ट्रेलिया
अनुभवी झुलन गोस्वामी, युवा पूजा वस्त्रकार यांची भेदक गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा व यास्तिका भाटिया यांची शानदार अर्धशतके यांच्या बळावर भारतीय महिलांनी येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची 26 सामन्यांची विजयी मालिका खंडित करताना दोन गडय़ांनी विजय मिळविला. मात्र ऑस्ट्रेलियन महिलांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 37 धावांत 3 बळी मिळविणाऱया भारताच्या झुलन गोस्वामीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.
ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडल्यावर निर्धारित 50 षटकांत 9 बाद 264 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 49.3 षटकांत 8 बाद 266 धावा जमवित दोन गडय़ांनी विजय मिळविला. भारताचा हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. आता या दोन संघात 30 सप्टेंबरपासून एकमेव डे-नाईट कसोटी होणार आहे.
आव्हानात्मक उद्दिष्टाचा पाठलाग करताना शफाली वर्मा (56) व स्मृती मानधना (22) यांनी भारताला अपेक्षित असलेली सुरुवात करून देताना 11 षटकांत 59 धावांची सलामी दिली. ऍश्ले गार्डनरने ही जोडी फोडताना स्मृतीला बाद केले. यास्तिका भाटियाने शफालीला सुरेख साथ दिली आणि या दोघींनी दुसऱया गडय़ासाठी शानदार शतकी (101) भागीदारी नोंदवली. 25 षटकाअखेर या दोघींनी 1 बाद 131 अशी मजल मारून दिली होती. 17 वर्षीय शफालीने अखेरपर्यंत खेळण्याचा निर्धार केल्याचे जाणवत होते. पण पाठदुखी आणि थकवा याच्याशी संघर्ष करीत खेळताना ती अर्धशतक पूर्ण झाल्यावर बाद झाली. 86 चेंडूत 7 चौकारांसह तिने वनडेतील पहिले अर्धशतक नोंदवले. भाटियादेखील नंतर फारवेळ टिकली नाही. स्ट्रनोने अप्रतिम झेल टिपत तिची खेळी संपुष्टात आणली. भाटियाने 69 चेंडूत 9 चौकारांसह 64 धावा फटकावल्या. अर्धशतकाआधी तिला एक जीवदानही मिळाले होते.
या दोघी बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. रिचा घोष शून्यावर बाद झाली तर पूजाने 3 धावा केल्या. यावेळी 5 बाद 192 अशी भारताची स्थिती होती. कर्णधार मिताली राजने (16) कोंडी फोडताना कॅम्पबेलला षटकार मारला. मात्र तीदेखील फार वेळ टिकली नाही. सुरदलँडने 16 धावांवर तिला त्रिफळाचीत केले. मात्र स्नेह राणा (27 चेंडूत 30) व दीप्ती शर्मा (30 चेंडूत 31) यांनी आक्रमफ फटकेबाजी करीत झटपट 33 धावा जोडत संघाला विजयासमीप आणले. झुलन गोस्वामी व मेघना सिंग यांनी नंतर शेवटच्या षटकात विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताला 34 अवांतर धावांचाही फायदा झाला. त्यात 31 वाईड, 1 नोबॉल, 2 लेगबाईजचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाच्या सुदरलँडने 3, मॅकग्रा, सोफी मोलिन, गार्डनर, कॅम्पबेल, कॅरे यांनी एकेक बळी मिळविला.
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणून देखील पुढे पकड सैल झाल्याने त्यांची सुटका झाली. 25 षटकांत 4 बाद 87 अशा स्थितीनंतर गार्डनर (67) व बेथ मुनी (52) यांनी डाव सावरताना 98 धावांची भागीदारी केली तर ताहलिया मॅकग्राने 32 चेंडूत जलद 47 धावा फटकावल्या. याशिवाय ऍलीसा हीलीने 35, एलीस पेरीने 26, रॅशेल हेन्सने 13, निकोला कॅरेने नाबाद 12 धावा जमविल्याने त्यांना निर्धारित षटकांत 9 बाद 264 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताची मध्यमगती गोलंदाज पूजा वस्त्रकारने 46 धावांत 3 तर अनुभवी झुलनने 37 धावांत 3 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलियन महिला 50 षटकांत 9 बाद 264 ः हेन्स 13, हीली 35, लॅनिंग 0, एलीस पेरी 26, बेथ मुनी 52, गार्डनर 62 चेंडूत 8 चौकार, 2 षटकारांसह 67, मॅकग्रा 32 चेंडूत 7 चौकारांसह 47, कॅरे नाबाद 12, अवांतर 11. गोलंदाजी ः झुलन गोस्वामी 3-37, पूजा वस्त्रकार 3-46, स्नेह राणा 1-56.
भारतीय महिला 49.3 षटकांत 8 बाद 266 ः शफाली वर्मा 91 चेंडूत 56, स्मृती 25 चेंडूत 22, यास्तिका भाटिया 69 चेंडूत 64, रिचा घोष 0, मिताली राज 16, पूजा वस्त्रकार 3, दीप्ती शर्मा 30 चेंडूत 31, स्नेह राणा 27 चेंडूत 5 चौकारांसह 30, झुलन गोस्वामी नाबाद 8, मेघना सिंग नाबाद 2, अवांतर 34 (31 वाईड, 1 नोबॉल, 2 लेगबाईज). गोलंदाजी ः ऍनाबेल सुदरलँड 3-30, कॅरे 1-42, कॅम्पबेल 1-41, गार्डनर 1-30, सोफी मोलिन 1-41, मॅकग्रा 1-46.









