विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, आपसह अपक्षांकडून अर्ज दाखल : आज अर्जांची छाननी होणार
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी मोठी चुरस वाढली असून शेवटच्या दिवशी मंगळवारी 9 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. काही जणांनी शक्तिप्रदर्शन करून आपले अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याचबरोबर सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून अडविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या पाच समर्थकांना आत सोडण्यात येत होते.
विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता त्यामुळे भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. याचबरोबर आपतर्फे शंकर श्रीकांत हेगडे, अपक्ष म्हणून शंकर कुडसोमन्नावर, कलमेश गंगाई, नागाप्पा कळसण्णावर, जगदीश कवटगीमठ, अशोक हंजी यांनी अर्ज दाखल केले.
मंगळवारी विविध राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करणार होते त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱया सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक अडविण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना फेरा मारून जावे लागत होते. याचबरोबर वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.
राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आपल्या विद्यमान आमदारासह नेत्यांबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ अर्ज दाखल करताना मंत्री उमेश कत्ती, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार आनंद मामणी, आमदार महादेवप्पा यादवाड, ऍड. एम. बी. जिरली, मुतालिक देसाई यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्यावतीने चन्नराज हट्टीहोळी यांचा अर्ज दाखल करताना आमदार सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार ए. बी. पाटील यांच्यासह त्यांचे इतर समर्थक उपस्थित होते. आपच्यावतीनेही शंकर हेगडे यांचा अर्ज दाखल करताना आपचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, कमोदीनी भैरप्पन्नावर, भैरू पाटील, गुरुसिद्धाप्पा तोटगी हे उपस्थित होते.
अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी यांनी अर्जदाखल केला. त्यांनी शक्तिप्रदर्शनाने आपला अर्जदाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. एकूणच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराबरोबरच अपक्ष उमेदवारानेही शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी वेंकटेश कुमार यांच्याकडे हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
मतदान आणि मतमोजणीची तयारी
शुक्रवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हय़ात एकूण 8,875 मतदार आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी संबंधित महापालिका, नगरपंचायती, नगरपालिका, ग्राम पंचायत याठिकाणी मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
एकूण 10 जणांनी केले अर्ज दाखल
मंगळवारी 9 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर त्यापूर्वी संगमेश नागप्पा चिकनरगुंद यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता एकूण 10 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार दि. 24 रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.