एक तासात सव्वा एकर शेताची मशागत, पारंपारीक शेतीला आधुनिकतेची जोड
प्रतिनिधी / मिरज
शेतीच्या मशागतीसाठी लागणारे शेतमजूर आणि नांगर चालविण्यासाठी लागणाऱ्या बैलजोड्यांची अलीकडच्या काळात प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून मिरज तालुक्यातील ढवळी येथील अब्दुल हसन मुजावर या युवा शेतमजूराने पारंपारीक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांच्या लॉकडाऊनच्या कालखंडात युटूबवरील व्हीडीओ पाहून डिझेलवर चालणाऱ्या नांगराची निर्मिती या शेतकऱ्याने केली आहे. अल्पशिक्षित असूनही, एका अभियंत्याला लाजविणारे संशोधन केल्याबद्दल या युवा शेतकर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यंत्राचा बैलजोड्यांशिवाय शेतात नांगरण्यासाठी तसेच मशागतीसाठी उपयोग होत आहे. या यंत्राला एक व्यक्ती हाताळू शकते. एक एकर शेत नांगरण्यासाठी किंवा मशागतीसाठी दोन लिटर डिझेल लागते. एका तासात एक एकर शेतीची मशागत किंवा नांगरणी होऊ शकते. असे हे यंत्र सर्व नवीन साहित्य वापरून करायचे असेल तर 45 हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो, असे अब्दुल मुजावर यांनी सांगितले.








