26 मे रोजी शेतकऱयांचा देशव्यापी विरोध दिन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त किसान मोर्चाच्या 26 मे रोजीच्या देशव्यापी विरोध दिनाला 12 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी या राजकीय पक्षांनी संयुक्त विधान प्रसिद्ध करत पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी संघटना स्वतःच्या आंदोलनाला 6 महिने पूर्ण होणार असल्याने एक दिवसाचे देशव्यापी निदर्शने आयोजित करणार आहेत. त्यांच्या या निदर्शनाला समर्थन देणाऱया पक्षांमध्ये काँग्रेस, धजद, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, जेएमएम, नॅशनल कॉन्फरन्स, समाजवादी पक्ष, राजद, माकप आणि भाकप सामील आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य 10 पक्षांच्या अध्यक्षांनी संयुक्त वक्तव्याद्वारे शेतकऱयांच्या निदर्शनाला पाठिंबा दर्शविला आहे. 12 मे रोजी विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन केले होते. शेतकरी संघटना नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात अनेक टप्प्यांमध्ये चर्चा होऊन देखील तोडगा निघू शकलेला नाही. संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून तिन्ही कृषी कायद्यांवर चर्चा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते. संयुक्त किसान मोर्चामध्ये शेतकऱयांच्या 40 संघटना सामील आहेत.









