शेतकऱयांची संख्या पाहून पोलिसांची उडाली तारांबळ, केंद्र सरकारचा केला निषेध, ट्रक्टर, टेम्पो रस्त्यावरच थांबून केला रास्तारोको, महिलांची संख्या लक्षणीय

प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकार विरोधात शेतकऱयांनी तीव्र आंदोलन केले. शेतकरी संघटनांनी विविध ठिकाणी रास्तारोको, टायर पेटवून तसेच भव्य मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला आहे. कृषी कायदे रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होत असल्याने पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनकर्त्यां शेतकऱयांना तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांची सुटका केली आहे.
कडोलीसह परिसरातील शेतकऱयांनी भव्य मोर्चा काढला. अचानकपणे हा मोर्चा आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. कडोली परिसरातून 2 हजारांहून अधिक जणांचा मोर्चा आल्याने पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले. ट्रक्टर, टेम्पो यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर या शेतकऱयांनी धडक मारली.
तीन कायदे तातडीने रद्द करावेत
कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करुन केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. शेतकऱयांच्या विरोधातील जे तीन कायदे केले आहेत ते तातडीने रद्द करावेत, रोजगार हमी योजना ही कृषी विभागाला जोडावी, यासह इतर मागण्या यावेळी या शेतकऱयांनी केल्या. आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अत्यंत शिस्तबद्धरित्या हा मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
कडोली परिसरातून हजारोंच्या संख्येने शेतकरी बेळगावकडे येत आहेत हे समजताच कित्तूर चन्नम्मा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलीस फौजफाटा मागविण्यात आला. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे देखील तातडीने दाखल झाले. शेतकऱयांनी कित्तूर चन्नम्मा-आरटीओ सर्कल या रस्त्यावर ट्रक्टर आणि टेम्पो उभे करुन रास्तारोकोच केला.
या रस्त्यावरच वाहने अडवी लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱयांना विनवणी करुन वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला आणि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. विद्युत विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो तातडीने थांबवावा, शेतकऱयांकडून वीज बील आकारण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी शेतकऱयांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठय़ा संख्येने शेतकरी जमल्याने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना तातडीने बोलावून आणले. त्यानंतर शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. यावेळी आप्पासाहेब देसाई यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. या मोर्चामध्ये सुभाष धायगोंडे, मारुती कडेमनी, चंद्रू राजाई, नामदेव धुडूम, बाळू मायण्णा, रामनगौडा पाटील, भैरु डंगरले, दुद्दाप्पा पाटील, नागन्ना देसाई, मंजू गडकरी, राजू कागणीकर, सुधीर जाधव, नागेश देसाई यांच्यासह आदी उपस्थित होते.
आपचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी
देशव्यापी बंदला ‘आप’ने पाठिंबा दिला होता. त्यानंतर बेळगावातील आपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चामध्येही आपला सहभाग दर्शविला. केंद्र सरकारचा निषेध नोंदवत त्यांनीही शेतकऱयांना यावेळी आपला पाठिंबा दिला आहे.
रयत संघटनेचा कित्तूर चन्नम्मा येथे रास्तारोको
रयत संघटनेने कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करुन केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. शेतकऱयांनी ठाण मांडून त्या ठिकाणी रास्तारोको केला. त्यावेळी पोलिस आणि त्यांच्यामध्ये झटापट झाली. जाचक कायदे रद्द करा, अन्यथा शेतकरी तुम्हाला हिसका दाखवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. पोलिसांनी शेतकऱयांना तातडीने अटक करुन त्यांना तेथून हलविले.
मध्यवर्ती बस स्थानकासमोर टायर पेटवून केला निषेध
भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने सकाळीच मध्यवर्ती बस स्थानकासमोर टायर पेटवून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. बस वाहतूक थांबवा, अशी मागणी शेतकऱयांनी केली होती. मध्यवर्ती बस स्थानकासमोरच शेतकऱयांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी तातडीने त्यांना अटक करून एपीएमसी आणि माळमारुती पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आले होते.









