संयुक्त किसान मोर्चाकडून हाक- काँग्रेस, आप, बसपचा पाठिंबा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱया शेतकऱयांचे नेतृत्त्व करणाऱया ‘संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यांच्या या आवाहनाला दाद देत काँग्रेससह केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी आणि मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच आंध्रप्रदेशसारखी काही राज्ये आणि देशातील बहुतांश शेतकरी संघटनांनीही बंदमध्ये सहभागी होण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार सोमवार, 27 सप्टेंबर रोजी शेतकऱयांचा देशव्यापी बंद होणार आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत बंदचे आयोजन करण्यात आल्याचे मोर्चाने म्हटले आहे. या काळात सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रति÷ाने बंद राहतील. सर्व आपत्कालीन प्रति÷ाने, सेवा, रुग्णालये, औषध दुकाने, मदत आणि बचाव कार्य आणि वैयक्तिक आपत्कालीन परिस्थिती असलेल्या लोकांना बंदमधून वगळण्यात आले आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा तोडफोड करण्यास मनाई असल्यामुळे ‘बंद’मध्ये सहभागी होणाऱयांनी स्वेच्छेने सहभागी दर्शवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेससह काही प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा
केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. तसेच आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही आपण ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. राजकीय पक्षांबरोबरच काही राज्यांनीही बंदला पाठिंबा दर्शवला असून त्यामध्ये प्रामुख्याने आंध्रप्रदेश सरकारचा समावेश आहे. आंध्र सरकारने बंदला पूर्ण पाठिंबा दिल्यामुळे तेथे आंदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद मिळण्याची संभावना आहे. काँग्रेसने आंदोलक शेतकऱयांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणीही केली आहे. काँग्रेस पक्ष आणि त्याचे सर्व कार्यकर्ते 27 सप्टेंबर रोजी शेतकरी संघटना आणि शेतकऱयांनी पुकारलेल्या शांततापूर्ण भारत बंदला पाठिंबा देतील, असे काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले.
दिल्लीच्या सीमेवर कडक सुरक्षा
बंदच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान निदर्शकांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली असून ती पूर्णपणे सतर्क आहे.









