राज्यातील प्रगतशील शेतकऱयांचा सहभाग
प्रतिनिधी / फोंडा

गोवा राज्य कृषी विपणन मंडळ आणि गोवा शेतकरी यांच्या संयुक्त सहकार्याने फोंडा येथे काल रविवारी येथे भरविण्यात आलेल्या ‘शेतकरी बाझार’ या कृषी बागायती उत्पादनांच्या विक्री प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेतोडा-निरंकाल मार्गावरील मार्केट यार्डमध्ये हा कृषी बाजार भरविण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत फोंडा शहरात भरलेले हे पहिलेच विक्री प्रदर्शन. त्यामुळे बऱयाच दिवसानंतर लोकांना घराबाहेर पडून शेतीसंबंधी साहित्य व गृहोपयोगी वस्तुंची खरेदी करता आली.
विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बी बियांणे, सेंद्रिय खते, कोकम व आमसुले, तसेच बागायती फळे, आंबा व घरघुती खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा त्यात समावेश होता. शेतीसाठी लागणारी आधुनिक व यांत्रिक अवजारे, किटकनाशके व इतर गृहोपयोगी वस्तू मिळून साधारण 32 विक्री व प्रदर्शनाचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले होते.
राज्यातील प्रगतशील शेतकऱयांचा सहभाग

गोव्याच्या विविध तालुक्यांतील प्रयोगशील शेतकरी व बागायतदारांशी ग्राहकांना यावेळी चर्चा करुन काही नवीन रोपांविषयी माहिती जाणून घेता आली. गावठी बागायती फळांबरोबरच, सेंद्रिय खते व रोपे खरेदीसाठी ग्राहकांचा जास्त उत्साह दिसून आला. बॉन्साय पद्धतीने लागवड केलेली फळझाडे तसेच गायीच्या शेणापासून तयार केलेल्या कलाकृती हे या प्रदर्शनातील खास आकर्षण ठरले.
या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन विपणन मंडळाचे फोंडा विभागाचे अध्यक्ष तथा बेतोडय़ाचे सरपंच दुर्गाप्रसाद वैद्य यांच्याहस्ते करण्यात आले. संचालक विकास प्रभू, गोवा शेतकरी संघटनेचे मनोज गावकर व मंगेश खेडेकर हे उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या कृषी बाजारात शेतीविषयी आवड असलेल्या ग्राहकांनी विविध वस्तूंची खरेदी करतानाच विविध बागायती झाडांच्या लागवडीसंबंधी माहिती जाणून घेतली.









