जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे एका दलित व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याला लॉकअपमध्ये डांबण्यात आले. मात्र त्याचा तेथेच मृत्यू झाला. याला सर्वस्वी पोलीसच जबाबदार आहेत. अशाच प्रकारे हरियाणा सीमेवरही एका दलित व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. तसेच शेतकऱयांवर वाहन चालवून चिरडण्यात आले आहे. देशातील या घटना अत्यंत गंभीर आहेत. तरी राष्ट्रपतींनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून सरकारला सक्त ताकीद करावी,अशी मागणी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
आहे.
अरुण कुमार बाल्मिकी याला पोलीस स्थानकात बोलावून घेण्यात आले. चौकशीच्या नावाखाली त्याला जबर मारहाण करण्यात आली. चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. दुसऱया दिवशी लॉकअपमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. तर दुसऱया घटनेमध्ये हरियाणाच्या सीमेवर लकबीरसिंग या तरुणाचाही खून करण्यात आला. तर उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथे शेतकऱयांवर वाहन चालविण्यात आले. या घटनांमुळे दीन दलित आणि शेतकरी संकटात आहेत. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून सरकारला सक्त ताकीद करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काशिराम चव्हाण, मुरली चव्हाण, पी. एल. राजपूत, सुखदेव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









