जावली तालुक्यात प्रथम महिला सैनिक होण्याचा सन्मान
वार्ताहर / कास :
जावली तालुक्यातील गांजे गावच्या कन्येने खडतर परिश्रम घेत सैन्यदलात भरती होण्याची जिद्द पूर्ण करून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले. ती तालुक्यातील प्रथम महिला सैनिक झाली आहे.
शिल्पा पांडुरंग चिकणे हे तिचे नाव… मेढ्याच्या दक्षिणेला गांजे गाव आहे. गांजे गावातील पांडुरंग चिकणे व आई पार्वती चिकणे ह्या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी तिचा जन्म झाला. शिल्पासह या दाम्पत्याला एकूण सहा मुली. ग्रामीण भागात मुलगा हवाच या मानसिकतेतील कुटुंबांत शिल्पाने सैन्य दलात भरती होवून मुलाच्या तोडीचे काम करून एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
प्राथमिक शिक्षण गांजे गावात घेवून काॅलेजसाठी शिल्पा मेढा या तालुक्याच्या ठिकाणी जावू लागली. डोक्यात एकच वेड होत सैन्य दलाच. त्या दृष्टीने तिने बारावीनंतर खडतर परिश्रमाला सुरूवात केली. जावली करिअर ॲकॅडमीमधे प्राध्यापक संतोष कदम यांच्या कडे ती कठोर मेहनत घेवू लागली. संतोष कदम यांनी ही घरची परिस्थिती लक्षात घेवून शिल्पाला एक रुपया ही न घेता दत्तक घेतले. अडीच वर्ष त्यांनी शिल्पावर कठोर मेहनत घेतली. शिल्पा नेही घरची अगदी हलाखीची परिस्थिती पन त्याचा बाऊ न करता ती परिस्थितीशी लढत मेहनत घेत होती. हे करतच शशिकांत शिंदे महाविद्यालयामधे आपले काॅलेज चे शिक्षण चालू ठेवले. सद्या ती बी काॅम च्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे.
भारतीय सैन्य दलात जागा निघाल्या. नंतर तीने फाॅर्म भरला. शारिरीक फिटनेस परिक्षा कोल्हापूर येथे दिल्यानंतर त्यात ती सिलेक्ट झाली. मग उरण येथे लेखी परिक्षा तर मेडिकल पुणे येथे झाले. तीन ठिकाणी चांगल्या पद्धतीने यश मिळाल्यावर आजच तिला आसाम रायफलमध्ये निवड झाल्याचे कळाल्यानंतर अख्ख्या कुटुंबात आनंदाला उधाण आले.