21 मार्च रोजी देशव्यापी निदर्शने करणार संयुक्त किसान मोर्चा
नवी दिल्ली
संयुक्त किसान मोर्चा 21 मार्च रोजी देशव्यापी निदर्शने करणार आहे. लखीमपूर खीरी प्रकरणातील सरकारची भूमिका आणि शेतकरी संघटनांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. नवी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली असून यात भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यात आली आहे.
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्राप्त झालेले समर्थन पुन्हा तितक्याच प्रमाणात प्राप्त करणे संयुक्त किसान मोर्चाला अवघड ठरणार असल्याचे विश्लेषकांचे मानणे आहे. तिन्ही कृषी कायदे यापूर्वीच रद्द करण्यात आले आहेत.
शेतकऱयांचे लक्ष्य केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित नव्हते असे संयुक्त किसान मोर्चामधील एका पदाधिकाऱयाने म्हटले आहे. परंतु संयुक्त किसान मोर्चाने उत्तरप्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी प्रचार केला होता. आंदोलनादरम्यान शेतकऱयांवर नोंद सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी मोर्चाने लावून धरली आहे. यातील काही गुन्हे हे युएपीए अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. तर पिकांसाठी हमीभावाचा कायदा आणण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाकडून केली जात आहे.
आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीसंबंधी बोलू इच्छित नसल्याचे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे चेहरे ठरलेले राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.








