
वृत्तसंस्था /मुंबई :
कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गाचा सर्वाधिक फटका सोसलेल्या प्रवासी विमान उद्योगाची स्थिती 2024 पर्यंत सुधारणार नाही, असे निराशाजनक मतप्रदर्शन या उद्योगातील जाणकारांनी केले आहे. कोरोना संसर्गामुळे बहुतेक सर्व देशांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर बराच काळ बंदी घातली होती. सध्या अनेक देशांमधील बंदी उठविण्यात आली असली तरी हा उद्योग कोरोनापूर्व स्थितीत येण्यासाठी आणखी किमान चार वर्षे लागणार आहेत.
अमेरिका व इतर विकसित देशांमध्ये कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण सध्या घटले आहे. तसेच मृत्यूदरातही घट झाली आहे. ही स्थिती आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी काहीसे समाधान देणारी असली तरी अद्याप लोकांच्याच मनात भीतीने ठाण मांडले आहे. त्यामुळे अनेक देशांमधील टाळेबंदी उठविण्यात आली असली आणि विमान प्रवासावरील निर्बंध हटविण्यात आले असले तरी बव्हंशी लोकच विमान प्रवास टाळत आहेत. लोकांची मानसिकता पूर्वपदावर येईपर्यंत या उद्योगाला सुधारण्याची आशा धरता येणार नाही, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
संघटना मात्र आशावादी
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेने सद्यस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली असली तरी नजीकच्या भविष्यकाळात उद्योगाची स्थिती सुधारण्याची आशा आहे, असे म्हटले आहे. संघटनेच्या प्राथमिक अनुमानानुसार 2025 पर्यंत स्थिती असमाधानकारकच राहणार होती. तथापि, आता या अनुमानात एक वर्षाने घट करण्यात आली आहे. सध्या विमान प्रवास करणाऱयांच्या संख्येत अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात सुधारणा होत आहे. जगभरात प्रतिदिन 60 लाखांहून अधिक लोक विमान प्रवास करतात. सध्या ही संख्या 20 लाखांहूनही कमी आहे.








