एचडीएफसी नफ्यात: सेन्सेक्स 84 तर निफ्टीत 22 अंकांची वाढ
वृत्तसंस्था / मुंबई
सकाळच्या सुरुवातीच्या सत्रापासूनच तेजीत असलेल्या शेअर बाजाराने शेवटपर्यंत तेजी कायम टिकवण्यात सोमवारी यश मिळविले. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 84.31 अंकांच्या वाढीसह 40593.80 वर आणि 22.05 अंकांच्या वाढीसह निफ्टीचा निर्देशांक 11,930 वर बंद झाला. सकारात्मक जागतिक संकेताच्या बळावर बाजाराने आज तेजी कायम ठेवली. यात एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यासारख्या दिग्गज कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले.
आज सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 400 अंकांनी तेजी दर्शवत होता. 30 समभागांचा सेन्सेक्स 396 अंकांच्या वाढीसह 40905.49 वर आणि निफ्टी 107.85 अंकांच्या वाढीसह 12022.05 अंकांवर होता.
सेन्सेक्समधील आयटीसी, इन्फोसिस, पॉवरग्रीड, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि टायटन यांचे समभाग तेजीसह बंद झाले तर दुसरीकडे बजाज ऑटो, ओएनजीसी, एनटीपीसी या कंपन्या नुकसानीत राहिल्या.
रुपयात होणारी वाढ थांबली
विदेशी विनीमय बाजारात सोमवारी रुपया 12 पैशांनी घटून 73.28 प्रति डॉलरवर बंद झाला. सलग तीन व्यावसायिक सत्रांमध्ये तेजी दर्शविणारा रुपया सोमवारी घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया मजबूत स्थितीत होता. एकावेळी दिवसभरात रुपया 73.06 प्रति डॉलरवर पोहचला होता. दिवसभराच्या व्यवहारात रुपयात 25 पैशांची चढउतार दिसून आली. शेवटी रुपया 12 पैशांनी घसरून बंद झाला. जाणकारांच्या मते इतर आशियाई चलनाच्या तुलनेमध्ये डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयावर दबाव आला. पण दुसरीकडे कच्च्या तेलाची किंमत कमी राहिल्याने त्याचा आधार रुपयाला मिळाला.
मागच्या आठवडय़ात शुक्रवारी बाजार तेजीसह बंद झाला होता. शेअर बाजाराने दाखवलेली तेजी येणाऱया काळात कायम राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.