कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करण्यासाठी 15 ते 17 दरम्यान नॅक पिअर कमिटी येणार आहे. 6 तज्ञांची ही कमिटी रविवारी कोल्हापुरात मुक्कामास येणार आहे. 70 टक्के गुणांकनासाठीचा अहवाल ऑनलाईन सादर केला आहे. नॅक कमिटीसमारे 30 टक्के गुणांसाठी पहिल्यांदा कुलगुरू सादरीकरण करणार आहेत. विद्यापीठ मूल्यांकनासाठी सज्ज असून `नॅक ए प्लस’ मिळवण्याच्या तयारीत आहे. अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, संशोधन आदी सात मुद्दÎांवर नॅकचे मूल्यांकन होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात सोमवार ते बुधवार अशी तीन दिवस नॅक पिअर समिती नूक मूल्यांकन करणार आहे. उदयपूर येथील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय कमिटी पाहणी करणार आहे. सचिव बेंगलोर डॉ. बी. आर. कौशल, पश्चिम बंगाल येथील एस. ए. एच. मोनुद्दिन, पंजाब, भटिंडा येथील डॉ. तरूण अरोरा, दिल्ली येथील डॉ. सुनिल कुमार, मेघालय शिलाँग येथील डॉ. हरिश्चंद्र दास या सदस्यांचा कमिटीमध्ये समावेश आहे. विद्यापीठातील मूलभूत सुविधा, शिक्षणासाठीची उपकरणे, प्रयोग शाळा, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधा, प्रशासन कसे चालते, कमवा व शिका योजना, पर्यावरणपूरक विद्यापीठ, परिसरातील जैवविविधता, पाणी व्यवस्थापन आदींची पाहणी करणार आहेत. गेल्या दोन महिन्यापासून नॅक मूल्यांकनाची तयारी सुरू आहे. 15 ते 16 दरम्यान 34 पैकी 17 अधिविभागांची पाहणी, प्रेझेंटेशन, विविध घटकांशी संवाद साधणार आहेत. 17 मार्च रोजी दुपारनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नॅक कमिटीला कोल्हापूर संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. नॅक मूल्यांकना दरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन केले जाणार आहे.
विद्यापीठात उपयोजित संशोधनावर भर
शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या पाच वर्षात 21 पेटंट मिळवली आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र यासह अर्थशास्त्र विभागानेही संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यापीठात मूलभूत संशोधनाबरोबर उपयोजित संशोधनावर भर दिला जातो. अधिविभागातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांना शिष्यवृत्तीही दिली जाते.