प्रतिनिधी / बेळगाव
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध योजना राबवून शहर स्मार्ट बनविण्यात येत आहे. मात्र, काही रस्त्यांच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. टिळकवाडी शिवाजी कॉलनीकडे जाणाऱया वीरसौधशेजारील रस्त्याची दुरवस्था झाली असून, रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरातील विविध प्रमुख रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. टिळकवाडीतील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर्स घालण्याचे काम सुरू आहे. पण काही रस्त्यांवर अद्याप खडीदेखील घालण्यात आली नाही. परिणामी रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. टिळकवाडी येथील विविध रस्त्यांचा विकास केला, पण शिवाजी कॉलनीत जाणाऱया रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. वीरसौधशेजारी असलेला हा रस्ता विकासापासून वंचित आहे. सदर रस्त्यावर डेनेज वाहिनी घालण्यासाठी खोदाई केली होती. सध्या पावसाचे पाणी साचून रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पावसामुळे चिखलाचे साम्राज्य
शांतीनगर, गजानन महाराजनगर तसेच मंडोळी रोडला जाण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची, विशेषतः दुचाकी वाहनांची नेहमी गर्दी असते. पण सध्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. त्यामुळे रस्त्याचा विकास करणे गरजेचे आहे. महापालिकेसह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी या रस्त्याच्या विकासाकडे कानाडोळा केला आहे.
स्वच्छता करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष
रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात आल्याने उकिरडय़ाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वीरसौधमधील झाडांच्या फांद्या या ठिकाणी पडत असतात. त्यांची उचल केली जात नाही. महापालिकेकडे तक्रार करूनही स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. एकंदर येथील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन येथील समस्या निदर्शनास आणून देण्याचा विचार येथील रहिवाशांनी चालविला आहे. परिसरातील समस्यांची पाहणी करून तातडीने उपायोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे.