पावसाळय़ात कचरा अडकून पाणी साचण्याचा धोका : जलवाहिन्या-विद्युतवाहिन्या हटविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील गटारी स्वच्छ करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच गटारींमधील जलवाहिन्या व विद्युतवाहिन्या हटविण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे. मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा गटारांमधून होत नसल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे. शिवाजी कॉलनी परिसरातील गटारींमध्ये जलवाहिन्या व विद्युतवाहिन्यांमुळे कचरा साचत असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या अर्धवट कामांचा नमुना वळीव पावसामुळे चव्हाटय़ावर आला आहे. वळीव पावसामुळे गटारींमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ठिकठिकाणी गटारींमध्ये कचरा साचून राहिला आहे. तसेच काही ठिकाणी जलवाहिन्या, विद्युतवाहिन्या न हटविताच स्मार्ट सिटी कंपनीने गटारींचे बांधकाम केले आहे. याठिकाणी गटारींमध्ये चार ते पाच विद्युतवाहिन्या आहेत. त्यामुळे विद्युतवाहिन्यांमध्ये कचरा अडकून राहिल्याने गटारींमधून सांडपाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. शिवाजी कॉलनीमधील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. तसेच गटारींचे बांधकामही करण्यात येत आहे. वीरसौध शेजारी शिवाजी कॉलनीतील गटारीमध्ये कचरा अडकून राहिल्याचे निदर्शनास येते.
पावसाळय़ात शिवाजी कॉलनी परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. वास्तविक पाहता येथील गटारी अरुंद असल्याने टिळकवाडी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होते. तसेच याठिकाणी तीन ठिकाणाच्या गटारी येवून मिळतात. अशातच गटारींमधील विद्युतवाहिन्या आणि जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पण ही समस्या कायमच भेडसावण्याची शक्मयता आहे. त्यामुळे गटारींमधील विविध वाहिन्या हटविण्याची गरज असून गटारीमध्ये कचरा टाकणाऱयांना समज देण्याचीही गरज आहे.









