प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटीअंतर्गत शहरामध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, त्या विकासांतर्गत केलेली रस्ते खोदाई योग्यरीतीने पूर्ण होत नसल्याने अद्यापही मोठी वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
सोमवारी सायंकाळी शहापूर येथून बेळगावला येणारे बोलेरो वाहन एस. पी. एम. रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर अडकून पडण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वाहनमालकांना याचा फटका बसत आहे तर वाहनधारक व पादचाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत डेनेज वाहिन्यांसाठी व इतर कामासाठी रस्ते खोदाई केली जात आहे. मात्र, या खोदण्यात आलेल्या चरी योग्यरीतीने बुजविण्यात आल्या नसल्याने अद्यापही अशा ठिकाणी अवजड वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
यामुळे या अडकलेल्या वाहनांना चरीमधून काढण्यासाठी वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर अडकलेले वाहन काढण्यासाठी वेळ लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या चरी व्यवस्थित बुजवून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.









