तीन वर्षे उलटली : कामे केव्हा पूर्ण होणार?
प्रतिनिधी /बेळगाव

शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत काँक्रीटचे रस्ते, गटारी निर्मितीचे काम सुरू आहे. परंतु कामामध्ये सातत्य नसल्याने तीन वर्षे उलटली तरी अद्याप शिवबसवनगर येथील रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. जागोजागी खोदाई करण्यात आलेल्या खड्डय़ांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, अशी विचारणा नागरिकांमधून केली जात आहे.

गँगवाडी कॉर्नरपासून केपीटीसीएल रोडपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम स्मार्ट सिटीअंतर्गत केले जात आहे. काँक्रिटीकरणासोबतच फूटपाथ व सायकल ट्रक यांचेही बांधकाम सुरू आहे. कामामध्ये सातत्य नसल्याने काम रखडले जात आहे. त्यामुळेच तीन वर्षे उलटली तरी अद्यापही गटारीचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना या कामांचा फटका बसत आहे.
एसजीबीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर गटारीचे बांधकाम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. खोदाई केलेल्या खड्डय़ात सांडपाणी व पावसाचे पाणी भरल्याने हा खड्डा रात्रीच्यावेळी निदर्शनास न आल्यामुळे अपघात होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वेळीच पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.









