प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगावतर्फे मंगळवारी तिथीनुसार धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथे हा कार्यक्रम झाला. शंभूभक्तांनी एकत्रित येऊन तिथीनुसार संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला.
प्रेरणामंत्राने कार्यक्रमाला सुरुवात करून महाराजांच्या मूर्तीला उदित रेगे व अमोल केसरकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. नितीन कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आपले आयुष्य हिंदवी स्वराज्याचे व्रत घेऊन जगले. महाराजांची जयंती ही आपल्या हिंदू तिथीनुसार झाली पाहिजे. संभाजी महाराज पातशाही, डच, प्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या परकीय सत्तेविरुद्ध लढले. आणि त्या परकीय तारखेनुसार आपलेच काही लोक जयंती करण्याचा अट्टहास करताहेत, हे दुर्दैवी आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जयंती, पुण्यतिथी, शिवराज्यभिषेक दिन तिथीनुसारच केले जातात व समाजानेही ते तिथीनुसारच करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, गजानन निलजकर, प्रमोद चौगुले, अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, वैभव धामणेकर, नामदेव पिसे, विजय कुंटे, महेश पावले, ओंकार पुजारी, प्रतीक काकतकर, श्रीपाद कित्तूर, मिहीर बोंदे, रोहन आपटेकर, स्वप्निल वाघवडेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









