शिल्पा शेट्टी ही सडपातळ बांधा जपणारी अभिनेत्री. शिल्पा 45 वर्षांची आहे यावर कोणाचाही पटकन विश्वास बसणार नाही. शिल्पा नियमित योगासनं करते. या योगासनांमुळे तब्बेतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात. अपचन, आम्लपित्त या सर्वसाधारणपणे आढळणार्या पोटाच्या समस्या आहेत. तेलकट, मसालेदार खाण्यामुळे हा त्रास अधिकच वाढतो. मात्र शिल्पाने सांगितलेली योगासनं करून तुम्ही पोटाच्या तक्रारींना दूर ठेऊ शकता.
शिल्पाही इन्स्टाग्रामवर योगासनं करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. ती मध्यंतरी हिमाचल प्रदेशला गेली होती. मनालीतल्या निसर्गरम्य वातावरणात तिने योगासनं केली. या योगासनांचे व्हिडिओही इन्स्टावर पहायला मिळतात.
असंच एक योगासन म्हणजे पर्वतासन. शिल्पाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती सुरूवातीला पादहस्तासन करताना दिसते. त्यानंतर तिने पर्वतासन आणि मार्जरासनही केलं. या आसनांमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, असं ती सांगते. त्यातही पाठीच्या कण्याला विशेष लाभ होतात. रक्ताभिसरण सुधारतं आणि पचनसंस्थेच्या कार्याला गती मिळते. याच कारणामुळे पोटाच्या तक्रारीही कमी होऊ लागतात. म्हणूनच शिल्पाप्रमाणेच आपणही ही आसनं नियमितपणे करायला हवीत.









