शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनपेक्षित घटना घडली. ध्वजारोहणाचा मान सभापतींना असताना सभापती मिनाज युनुसअली जमादार यांनी तो मान मोठ्या मनाने आपल्या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रकाश आंबी यांना देत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. जमादार यांच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले होते.
एका कर्मचाऱ्याला ध्वजारोहण करण्याचा मान मोठ्या मनाने सभापती जमादार यांनी देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ध्वजवंदन आपल्या हस्ते व्हावे म्हणून अनेकजण खटाटोप करीत असतात. परंतु सभापती पदाचा कार्यकाळ कमी मिळाला असताना देखील त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी या कार्यक्रमास उपसभापती मल्लू खोत, माजी सभापती मल्लापा चौगुले, माजी उपसभापती संजय माने, कविता चौगुले, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी रूपनर, गटशिक्षणाधिकारी कामत, बांधकाम उपअभियंता के.ए.पाटील, ग्रामविस्तार अधिकारी प्रविण हेरवाडे, रवि कांबळे, कृषी विस्तार अधिकारी शिवाजी कोळी, महिला बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी, पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वप्नातही माझ्या हस्ते ध्वजारोहण होईल असे वाटत नव्हते : आंबी
सभापती यांनी ध्वजारोहण करण्यासाठी माझे नाव घेतले माझ्या स्वप्नातही माझ्या हस्ते ध्वजारोहण होईल असे वाटत नव्हते. गेली वीस वर्षे झाली या पंचायत समितीमध्ये शिपाई पदावर मी काम करीत आहे अनेक पदाधिकारी अधिकारी ध्वजारोहण केलेले पाहिले आहे. पण माझ्या असते हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान सभापती जमादार यांनी दिला आयुष्यभर आम्ही विसरू शकत नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबी व विश्वास कांबळे यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.