वार्ताहर/ तवंदी
निपाणी तालुक्यात कोरोना संसर्गाबरोबरच मृत्यूचाही आकडा वाढताच आहे. येथील नजीकच असलेल्या शिरगुप्पीत तर कोरोनाने थैमान घातले आहे. येथील 48 वर्षीय पोस्ट कर्मचाऱयाचा कोरोनाने मृत्यू झाला असून गावात कोरोनाने आतापर्यंत आठ बळी घेतल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीसह तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने 42 बळी घेतले आहेत.
सदर पोस्ट कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाल्याने निपाणी येथील खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती खालावत जाताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर निपाणीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरगुप्पीत कोरोना संसर्ग मोठय़ा प्रमाणात होताना आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे. वाढती कोरोना संख्या लक्षात घेत ग्रामपंचायतीने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे.
गावात सध्या 40 हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या किंवा लक्षणे आढळून येत असलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले आहेत. मात्र सदर स्वॅब अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. याबाबत तहसीलदारांना याची माहिती देण्यात आली आहे. तहसीलदारांनीही येथील वाढती कोरोना बळींची संख्या लक्षात घेत बैठक घेताना खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.









