पूर्णवेळ खुले असणाऱ्या एटीएम मशीनची मागणी
वार्ताहर / शिये
शिये तालुका करवीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखेत गेले तीन-चार दिवस कॅशियर नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.पूर्णवेळ ओपन असलेले एटीएम मशीनची सोय बॅंकेने करावी अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. शियेची लोकसंख्या जवळ्पास दहा हजार इतकी असून गावामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. कोणीही शाखा म्हणजे सोय पेक्षा गैरसोयीची जास्त आहे. राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असल्यामुळे गावातील बहुतांशी लोकांचे व्यवहार याच बँकेतून होत आहेत.
शिवाय गावातील दूध संस्थांची बिलेही याच बँकेत जमा होतात. पण गेले चार दिवस कॅशियर नाही एका सबबी खाली बँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. उन्हातान्हातून आलेले लोक बँकेचे शटर बंद असलेले पाहून निराश होऊन परत जात आहे. अशा वेळी या खातेधारकांना पैसे काढणे अथवा भरण्यासाठी पाच किलोमीटरवर असणाऱ्या एमआयडीसी शाखेमध्ये जावे लागते. खातेदारकांची गैरसोय होत असताना बँकेकडून मात्र तीन दिवसात यावर कोणताही पर्याय शोधण्यात आलेला नाही याबाबत विचारले असता शाखाधिकारी मुग्धा कुशे यांनी सांगितले की शाखेतील रोखपाल अचानक आजारी पडल्यामुळे रजेवर गेले आहेत.
त्यांच्या जागी बदली कर्मचारी मेळावा म्हणून मी वरिष्ठ शाखेकडे रीतसर पत्रव्यवहार केला आहे. परंतु मला कोणताही बदली कर्मचारी मिळाला नसल्याने रोखीचे व्यवहार करता येत नाही. यापूर्वीही तांत्रिक कारणास्तव बँक सलग चार दिवस बंद ठेवण्यात आली होती. लोकांच्या दारात जाऊन सेवा द्या, असा रिझर्व बँकेचा आग्रह असला तरी स्टेट बँकेचे शाखा दारात आलेल्या ग्राहकांनाही सेवा देऊ शकत नाही. बँकेने आपली सेवा सुरळीत ठेवावी अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.