मुख्यमंत्र्यांकडून अद्याप प्रस्तावाला मान्यता नाही
प्रतिनिधी / पणजी
राज्यात होणाऱया शिमगोत्सव संदर्भात गुंतागुंत वाढत चालली आहे. दिवसेंदिवस कोविड रुग्णाची संख्या वाढत असल्याने शिमगोत्सव आयोजित करण्यास परवानगी द्यावी की देऊ नये याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अद्याप घेतलेला नाही.
सरकारने शिमगोत्सवाबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याने शिमगोत्सव मिरवणुकांवर अनिश्चितचे सावट पसरले आहे. सरकारने या अगोदर म्हापसा व फोंडा येथे शिमगोत्सव आयोजित करण्याचे ठरविले होते. त्यानंतर पणजीमधून राजधानी पातळीवर झालेली मागणी लक्षात घेऊन पणजीसह तीन ठिकाणी शिमगोत्सव करण्याचे ठरविले होते. तथापि, आता कोविडच्या परिस्थितीमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाला असून दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन खात्याने शिमगोत्सव आयोजन संदर्भातील फाईल पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांच्याकडे पाठवली. बाबू आजगांवकर यांनी ती मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविली. मात्र मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अद्याप शिमगोत्सव आयोजनाच्या प्रस्तावास मान्यता दिलेली नाही.









