प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे, ‘शिक्षण म्हणजे केवळ तथ्य आणि त्याचा अभ्यास नसून, मनाला विचार करायला लावणारे प्रशिक्षण आहे.’ माणूस आयुष्यात सतत काही ना काही शिकत असतो. शाळेतून बाहेर पडला तरी शिक्षण काही थांबत नाही कारण आयुष्याचे सामर्थ्य हे अपरंपार आहे. माणूस शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर चंद्रावरच काय मंगळावर जाऊन पोहोचला आहे. योग्य ते शिक्षण किंवा उच्च शिक्षण प्राप्त केल्याने केवळ समाजमान्यता वृद्धी होत नाही तर माणसाला त्याचे सामर्थ्य लक्षात येते. ही क्षमता जर योग्य ठिकाणी वापरली तर जगात अनेक सकारात्मक बदल घडविण्याची ताकद माणसांमध्ये आहे.
असे म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे त्याचे आई वडील असतात. आई-वडील नातेवाईक यांच्या सान्निध्यात वाढत असताना माणूस नकळतपणे अनेक गोष्टी शिकत असतो. भाषा, राहणीमान, छोटय़ा छोटय़ा सवयी आणि छंदसुद्धा बरेचदा माणूस आपल्या भोवतालच्या माणसांकडे बघून शिकत असतो. म्हणूनच लहानपणापासून दिल्या जाणाऱया संस्कारांना खूप महत्त्व दिले आहे. एखाद्या मुलावर लहानपणी झालेले संस्कार व त्याला मिळालेले शिक्षण त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनतात.
भारताने शिक्षण क्षेत्रात पदोपदी प्रगती अनुभवलेली आहे. म्हणूनच भारतात पहिल्यापासूनच गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिले जायचे. मुले ठरावीक वयाची झाली की त्याने किंवा तिने आपल्या आई-वडिलांच्या छत्रछायेतून बाहेर येऊन आपल्या गुरुच्या घरी राहायला जायची पद्धत होती. त्या कालावधीत त्या विद्यार्थ्याला इतर कोणालाही भेटायची परवानगी नसायची. आजच्या तुलनेत ही फारच कठोर शिक्षा मानली गेली असली तरी तेव्हाच्या काळात माणसाचे व्यक्तिमत्त्व, त्याची विद्या आणि आणि त्याचे कौशल्य हेच त्याचे सर्वस्व होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पुरेपूर घडवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असावा.
पण, गुरुकुल पद्धती बंद होऊनसुद्धा आता अनेक वर्षे लोटली आहेत. शिक्षण आता एका विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट पुस्तकाद्वारे दिले जाते. कधीकाळी गुरुकुल पद्धतीची रीत पाळणारा भारत देश, आता शिक्षणाकडे एक संघटित प्रणाली म्हणून बघू लागला आहे. आता एका इयत्तेतदेखील अनेक वर्ग असतात आणि अनेक वर्गांची संख्या ही कमीत कमी वीस ते तीस मुले असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की दहा वीस तीस मुलांना सांभाळणारे शिक्षक मात्र एकच असतात. त्यामुळे इच्छा असूनसुद्धा शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणे शक्मय होत नाही. मुलांची संख्या जास्त असल्याने वर्गातील स्पर्धा तर वाढते पण त्या स्पर्धेसाठी तयारी करण्याची साधने ही सर्वांना प्राप्त होत नाहीत.
नवीन पिढी ही हुशार तर आहेच आणि त्यासोबतच स्वयंभूदेखील आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुलांकडे आज ज्ञानाची एक नवीन खिडकी उघडली आहे जी आधीच्या पिढीकडे नव्हती. त्यामुळे शाळा सुरू करण्याआधी देखील मुलांना बऱयाच गोष्टींचे ज्ञान असते.
सध्याच्या महामारीच्या काळात ऑनलाईन क्लासेसचा मार्ग निवडला गेला आहे.
शाळेत जायचे म्हटले की आदल्या दिवशीच्या रात्रीपासून तयारी करावी लागते. गणवेशाची इस्त्री झाली का, बूट पॉलिश झाले का, दप्तर भरले का, गृहपाठ झाला का, या सगळय़ाचा ताण लहान मुलांवर असतो. हा झाला वैयक्तिक पातळीवरचा संघर्ष. पण त्याहून मोठा संघर्ष म्हणजे दुसऱया दिवशी शाळेत जाऊन आपल्याच वर्गातील मित्र-मैत्रिणींबरोबर स्पर्धा करणे.
आता जर विचार करायचा झाला तर ती सगळी स्पर्धा ऑनलाईन झाली तर काय होईल? तसेही मुले ही शाळेत फक्त शिक्षण घ्यायला जात नाहीत तर ती एका समाजाचा महत्त्वपूर्ण भाग व्हायचे शिक्षणदेखील घेत असतात. परिस्थितीमुळे नाईलाजाने सर्व शाळा ऑनलाइन झाल्या आहेत त्यामुळे सामाजिक पैलू त्यांच्या आयुष्यातून अदृश्य झाला आहे. आपल्या घरात एकाच खोलीत एका यंत्राकडे तासन तास बघत बसणे आणि त्यात शिकवल्या जाणाऱया गोष्टी मनामध्ये रुजवणे खरंच कठीण आहे. आजची प्रगल्भ प्रौढ पिढीदेखील घरून काम करून वैतागली आहे. तर या चिमुकल्या मेंदूची काय दशा होत असेल? एवढेच नव्हे तर वाईट याचेसुद्धा वाटते की शाळेत मित्र-मैत्रिणींबरोबर आठवणी बनवण्याची संधी ही पिढी चूक नसताना गमावून बसली आहे.
पण हे लक्षात घेणे तेवढेच आवश्यक आहे की या चिमुकल्यांबरोबर आणखी कोणीतरी तेवढय़ाच ताणातून चालले आहे. ते म्हणजे त्यांचे शिक्षक आणि शिक्षिका. शाळा चालू असताना वर्गात 20-30 मुले मुली असली तरी नजरेसमोर असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे शक्मय होते. हाच वर्ग ऑनलाइन स्थलांतर झाल्याने शिक्षकदेखील गडबडले आहेत. ऑनलाइन शिकवत असताना मुलांवर लक्ष ठेवण्या बरोबरच शिक्षकांना तांत्रिक अडचणींनादेखील सामोरे जावे लागते. त्यामुळे आपली शिकवण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते की नाही हे कळणे खरंच कठीण झाले आहे.
जेव्हा एखादा विद्यार्थी त्याचे घर सोडून शाळेत जाऊन शिकतो तेव्हा तो आपल्या आईवडिलांच्या शिकवणीव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकतो व एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवीत असतो. पण ऑनलाइन प्रणाली असल्यामुळे काही पालक आपल्या मुलांबरोबर स्वतःचीदेखील अनधिकृत हजेरी लावतात आणि शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ठेवतात.
सर्वांनीच हे लक्षात घेतले पाहिजे की ऑनलाईन पद्धती जितकी आपल्या मुलांसाठी नवीन आहे तितकीच त्यांच्या शिक्षक शिक्षकांसाठीदेखील आहे. अध्यापन व्यवसाय नैसर्गिकरित्या आभासी नसून त्याला वेळ, संयम आणि एका वैयक्तिक स्पर्शाची गरज असते. कित्येक वयस्कर शिक्षक शिक्षिका आहेत जे तंत्रज्ञानाच्या फार संपर्कात आलेले नाहीत. अशावेळेला आपण कौशल्य असूनही ते आज मुलांना शिकवायला संघर्ष करत आहेत.
मानवतेला जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती सहानुभूतीची. प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काही ना काही अडथळय़ांना सामोरे जात आहे. पालकांनी स्वतःसोबत मुलांनादेखील शिक्षकांचे महत्त्व शिकवणे गरजेचे आहे. केवळ इंग्रजी बोलता येत नाही किंवा नवीन तंत्रज्ञान वापरता येत नाही म्हणून ते शिक्षक शिकवायला असमर्थ ठरत नाहीत.
औषधे आणि नवनवीन शोधांच्या साह्याने माणूस या महामारीचा हळूहळू खात्मा करत आहे. पण जोपर्यंत आपण ही लढाई जिंकत नाही, तोपर्यंत आपण एकमेकांच्या विरुद्ध नव्हे, तर एकमेकांबरोबर चालले पाहिजे. आपल्या मुलांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे वैयक्तिक संघर्ष ओळखून त्यांना प्रेरित केले तर कदाचित मानसिक भार तरी कमी होईल. हे लक्षात ठेवले पाहिजे की ही लढाई माणसाची माणसाशी नसून, मानवतेची आणि महामारीची आहे.
-श्राव्या माधव कुलकर्णी








