शाळेची नासधूस, कचरा टाकल्यामुळे शाळांच्या अडचणीत भर : समाजाने भान राखणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी शाळांची दुरवस्था आणि असुविधांचा सामना ही नेहमीचीच बाब आहे. त्यातही कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने शाळा आणि शाळेचा परिसर विद्यार्थ्यांविना ओस पडला आहे. मात्र शाळा सुस्थितीत राखण्यासाठी शिक्षकांकडून शाळांची स्वच्छता करून घेतली जात आहे. संरक्षक भिंतीविना असणाऱया शाळा, शाळेचे मैदान तसेच शाळेचा मोकळा परिसर जणू सार्वजनिक स्थळ बनला असून यामुळे विद्यार्थ्यांविना असणाऱया शाळा बकाल दिसत आहेत. शिक्षक शाळेत आहेत मात्र वर्दळ कमी आहे. परिणामी शाळेच्या मैदानावर खेळणे, संरक्षक भितंवर चढून शाळेची नासधूस करणे तसेच कचरा करणे भटक्या जनावरांचा वाढता वावर यामुळे शाळांच्या अडचणीत भर पडत आहे.
शाळा इमारतीचे नुकसान
शाळा सुस्थितीत राखण्यासाठी शिक्षकांकडून शाळेची स्वच्छता, साफसफाई करवून घेतली जात आहे. परिसरातील मुलांकडून करण्यात येणारी शाळा परिसराची अस्वच्छता आणि यामुळे होणारे शाळा इमारतीचे नुकसान या प्रकारामुळे नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. परिणामी विद्या मंदिराची काळजी घेण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांचीच नसून समाजाने भान राखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
अस्वच्छता करणाऱयांवर कारवाईची गरज
सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिपाई नसतात. यामुळे शाळा परिसर तसेच शाळेच्या इमारतीची स्वच्छता राखणे ही जबाबदारी खूप महत्त्वाची ठरते. मात्र बाहेरील नागरिकांकडून करण्यात येणाऱया शाळेच्या नासधुसीमुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून सोयीनुसार शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून स्वच्छता करून घेण्याची वेळ आली आहे. यामुळे शाळा परिसर अस्वच्छ करणाऱया नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.









