वार्ताहर/ जैतापूर
दिवसाढवळ्या वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱया टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना यश आले आहे.. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील गावठी बंदूक जप्त केली आहे.
अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये अनिल मोंडे, मंगेश बाणे, शरद मिरगुले, अक्षय राऊत, कल्पेश मिशाळ (राहणार कोंब, नानार, दत्तवाडी) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील हे सहकाऱयांसह बुधवारी दुपारी गस्त घालत असताना राजापूर-जैतापूर मार्गावरील चिरेखाण परिसरात अनिल मोंडे हे सहकाऱयांसह गाडीतून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करताना वाहनाची झडती घेतली असता गाडीत सिंगल बॅरल गावठी बंदूक असल्याचे आढळले.
संबंधितांकडे बंदुकीचा कोणताही परवाना नसताना बंदूक जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी मोंडे यांच्यासह अन्य 4 जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.. या कारवाईमध्ये पाटील यांच्यासह नाटे पोलीस ठाण्याचे विवेक साळवी, प्रसाद शिवलकर, हातीसकर, काळे, चव्हाण यांचा सहभाग होता.









