प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू स्टेडियमवर ‘जय शिवाजी…! निमित्त होते कटट्र पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवाजी विरुध्द पीटीएम ‘अ’ यांच्यातील सामन्याचे. या सामन्यात एका गोलने आघाडीवर असलेल्या पीटीएम ‘अ’ ला ‘शिवाजी मंडळ’ने 3 विरुध्द 1 गोलनी पराभवाचा ‘धक्का दिला. तर दुसऱया सामन्यात ऋणमुक्तेश्वरने कोल्हापूर पोलीस संघावर 4-1 गोलने एकतर्फी मात केली. दुपारी चार वाजता ’दोन पेठातील प्रमुख संघ शिवाजी तरुण मंडळ विरुध्द पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ यांच्यातील पारंपरिक लढत पाहण्यासाठी समर्थक, फुटबॉलप्रेमींनी छत्रपती शाहू स्टेडियमवरील प्रेक्षक गॅलरीत रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती.
पारंपरिक लढत पाहण्यासाठी समर्थक, फुटबॉलप्रेमींनी एका तास अगोदरपासूनच स्टेडियमवरील प्रेक्षक गॅलरी व तिकीट विक्री खिडकींवर गर्दी करण्यास सुरूवात केली होती. दुपारी चार वाजता सामना वेळेत सुरू झाला. यापूर्वी संपूर्ण शाहू स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांनी खचाखच भरली होती.
सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या वेगवान चालीत पीटीएमच्या ओंकार पाटीलने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत मोठया डीच्या बाहेरून तडकावलेला चेंडू थेट शिवाजी मंडळच्या गोलपोस्टमध्ये जाऊन स्थिरावला. अवध्या 2 ऱया मिनिटाला पीटीएमने एका गोलची आघाडी घेतली. यामुळे शिवाजीच्या करण चव्हाण-बंदरे, अकिम, दिपक तर्की, संकेत साळोखे, प्रथमेश कांबळे यांनी वेगावन खेळ करून प्रतिहल्ला चढविला. त्यांच्या आक्रमणापुढे पीटीएमची बचावफळी हतबल झाली. सामन्याच्या 21 व्या मिनिटाला शिवाजी मंडळच्या आघाडीफळीतील करण चव्हाण-बंदरेने तर 22 व्या मिनिटाला प्रथमेश कांबळेच्या पासवर अकिमने मैदानी गोल करून संघाला 2-1 गोलची आघाडी मिळवून दिली. पीटीएमकडून ओमकार जाधव, ओंकार पाटील, अक्षय, ऋषीकेश मेथे-पाटील, प्रथमेश हेरेकर, सुशांत बोरकर यांनी गोल आघाडी कमी करण्याचे केलेले प्रयत्न शिवाजी मंडळची बचावफळी व गोलकिपर मयुरेश चौगुलेने फोल ठरविले. पूर्वार्धात शिवाजी मंडळला 2-1 गोलची आघाडी कायम राखण्यात यश मिळाले.
उत्तरार्धात सामन्यावर वर्चस्व राखत शिवाजी मंडळच्या आघाडीफळीतील खेळाडूंनी पीटीएमवर गोल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. सामन्याच्या 67 व्या मिनिटाला शिवाजी मंडळच्या दिपक तर्कीने गोलपोस्टमध्ये मारलेला चेंडू गोलकिपरने तटविला. या गोंधळाचा फायदा उठवत रिबाँण्ड झालेला चेंडू क्षणाचाही विलंब न करता प्रणव कणसेने गोलपोस्टमध्ये मारल्याने शिवाजी मंडळने निर्णायक विजयाची 3-1 गोलची आघाडी घेतली. ही गोल आघाडी कमी करण्यात पीटीएमचे खेळाडू अपयशी ठरल्याने शिवाजी मंडळने सामना 3-1 गोलने जिंकला. या विजयामुळे शिवाजी मंडळने लीग विजेतेपदाकडे आगेकूच केली आहे.
तत्पूर्वी दुपारी 2 वाजता झालेल्या सामन्यात ऋणमुक्तेश्वर तरुण मंडळाने कोल्हापूर पोलीस संघावर 4-0 गोलने एकतर्फी मात केली. ऋणमुक्तेश्वरकडून 10 व्या मिनिटाला विकी जाधव, 19 व्या मिनिटाला अमित दुर्गुळे, 30 व्या मिनिटाला निलेश ढोबळे यांनी मैदानी गोल करून संघाला पूर्वार्धात 3-0 गोलची आघाडी मिळवून दिली. तर उत्तरार्धात ऋणमुक्तेश्वरकडून 51 व्या मिनिटाला निलेश ढोबळेने मैदानी गोल करून 4-0 गोलची निर्णायक विजयाची आघाडी मिळवून दिली.
रविवारचा सामना
दुपारी 2 वाजता – पीटीएम ‘ब’ विरुध्द मंगळवार पेठ.