प्रतिनिधी / बेळगाव
शाहूनगर दत्त गल्ली येथील रस्ता सीडीपीनुसार 60 फुटाचा करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यामुळे येथील रहिवाशांच्या घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार असून हा रस्ता केवळ 40 फुटाचा करावा, अशा मागणीचे निवेदन दत्त गल्ली, शाहूनगरमधील रहिवाशांच्यावतीने महापालिका आयुक्त व बुडा आयुक्तांना सोमवारी देण्यात आले.
शाहूनगर येथील दत्त गल्लीचा रस्ता 60 फुटाचा करण्याची मागणी होत आहे. पण प्रत्यक्षात या ठिकाणी 40 फुटाचा रस्ता सोडला आहे. दत्त गल्ली बी. के. कंग्राळी रोड ते दत्त मंदिर पर्यंतचा रस्ता 60 फुटाचा करण्याचा प्रस्ताव आहे. पण हा रस्ता केवळ 160 मिटरचा असल्याने 60 फुटाचा करण्याची आवश्यकता नाही. हा रस्ता पुढे बंद आहे. रस्त्याची रुंदी सीडीपीप्रमाणे केल्यास इमारतींचे नुकसान होणार आहे. येथील रस्त्याची रुंदी 40 फूट करून दोन्ही बाजुने गटारी बांधण्यात याव्यात व हा रस्ता व्यवस्थित करावा, असे निवेदन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देण्यात आले. यावेळी दत्त गल्लीमधील रहिवासी उपस्थित होते.









