स्व-खर्चातून रंगकाम करून शाळा बनविली आकर्षक : भिंतींवर अनेक चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी शाळा म्हणजे गळती आणि जीर्ण झालेल्या भिंती असे काहीसे चित्र आपल्यासमोर येते. मात्र अलीकडे सरकारी शाळादेखील स्मार्ट होताना दिसत आहेत. विश्वेश्वरय्यानगर येथील शाळा क्रमांक 26 देखील स्मार्ट झालेली पहायला मिळत आहे. यासाठी येथील शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. स्व-खर्चातून रंगकाम करून शाळा आकर्षक बनविली आहे. त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे.
एक चित्र हजार शब्दांचे काम करते. त्यामुळे अध्यापन कार्यात चित्रफितींना अधिक महत्त्व आहे. चित्रफितीद्वारे दिलेले ज्ञान दीर्घकाळ टिकते. याकरिता शाळेच्या भिंतींवर अनेक चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी शिक्षकवर्गाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाकाळात या शाळेतील शिक्षकांनी आपला वेळ वाया न घालविता शाळेच्या विकासासाठी आणि सुशोभिकरणासाठी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थी शाळेकडे आकर्षिले जावेत व दर्जात्मक शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने येथील शिक्षकांनी शाळेचे सुशोभिकरण केले आहे.
बालवयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, याकरिता शाळेच्या भिंतींवर राष्ट्रगीत, वंदेमातरम् लिहिले आहे. शिवाय जगाचा, देशाचा आणि राज्याचा नकाशा रेखाटण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटावे याकरिता ‘ए’ व्हिटॅमिन आणि ‘बी’ व्हिटॅमिनच्या आहाराविषयी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. कोरोनामुळे बऱयाच महिन्यांनंतर शाळांना प्रारंभ झाला आहे. त्यातच आकर्षक रंगरंगोटी केलेली शाळा विद्यार्थ्यांना साद घालताना दिसत आहे. शिवाय निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, याकरिता विविध निसर्गचित्रे, जलसंरक्षण, पर्यावरण संरक्षण यासंदर्भातील चित्रेदेखील हुबेहूब रेखाटली आहेत. शाळेतील आठ वर्गखोल्यांच्या अंतर्गत भागातदेखील रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यापनाचे कार्यदेखील सुरळीत आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी होत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, याकरिता कन्नड ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची यादीदेखील व्हरांडय़ात लावण्यात आली आहे. शाळेच्या परिसरात मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय शाळेला सुसज्ज असे मैदान असल्याने विद्यार्थ्यांचा शारीरिकदृष्टय़ा विकास होताना दिसत आहे.
सर्व शिक्षकांचा पुढाकार

कोरोनाकाळात वेळेचा सदुपयोग करून शाळेतील आठ वर्गखोल्यांचे रंगरंगोटीचे काम पूर्ण केले आहे. अध्यापनाला सोयीस्कर व्हावे, याकरिता वर्गखोल्यांच्या अंतर्गत भागातील कपाट, फळा यांचादेखील विकास साधला आहे. त्यामुळे अध्यापन कार्यात उत्सुकता निर्माण होत आहे. शाळेतील सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
– एस. बी. गस्ते (मुख्याध्यापिका, विश्वेश्वरय्यानगर, शाळा क्रमांक-26)









